Bhosari : रुग्णालयाचे खासगीकरण, सत्ताधा-यांचे ‘कटिबद्ध जनलुटाय’-जितेंद्र ननावरे

एमपीसी न्यूज – भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव अवघ्या 15 मिनिटांमध्ये विनाचर्चा न करता गदारोळात मंजूर करण्यात आला. करदात्याच्या पैशांची लूट करण्याचा डाव त्यामागे असून हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांनी सत्ताधा-यांना खासगीकरणाच्या माध्यमातून पैशाची लूट करण्याचा मार्ग खुला करून देऊन महापालिकेचे ब्रीदवाक्य ‘कटिबद्ध जनलुटाय’ असे केले अशी टीकाही त्यांनी केली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त संतोष पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात ननावरे यांनी म्हटले आहे की, वायसीएमएच रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी भोसरी रुग्णालय उभारले आहे. मात्र, हे रुग्णालय बांधल्यानंतर अचानकपणे महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांना हे रुग्णालय आपण चालवू शकत नसल्याचा साक्षात्कार झाला. 22 कोटी खर्च होईपर्यंत महापालिका अधिका-यांना ही बाब समजली नाही का ?

खासगीकरणाचा प्रस्ताव अतिशय चुकीच्या पद्धतीने सभागृहासमोर सादर केलेला आहे. यामध्ये नागरिक कोणताही असो महापालिकेने रुग्णसेवा अल्पदरात पुरविणे बंधनकारक असताना या रुग्णालयाचे खासगीकरण केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या ब्रीदवाक्यालाच हरताळ फासला गेला आहे. महापालिका आयुक्तांनी सत्ताधा-यांना खासगीकरणाच्या माध्यमातून पैशाची लूट करण्याचा मार्ग खुला करून देऊन महापालिकेचे ब्रीदवाक्य ‘कटिबद्ध जनलुटाय’ असे केले आहे

कोणत्या अधिका-याला आपण हे रुग्णालय चालू शकत नाही याचा साक्षात्कार झाला त्या अधिकाऱ्याचे नाव जाहीर करावे. महापालिकेला शहराचा विकास दर वाढवायचा आहे की? महापलिकेतल्या अधिकारी राज्यकर्ते व खासगी संस्थाचा विकास दर वाढवायचा आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे. हा प्रस्ताव मागे घ्यावा. अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा ननावरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.