Chinchwad : विजयकुमार पाटील यांना सामाजिक सेवा प्रबंधासाठी पीएचडी प्रदान

एमपीसी न्यूज – प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण अभ्यासक विजयकुमार पाटील यांना सामाजिक सेवा प्रबंधासाठी उत्तर प्रदेश वृंदावन धाम मथुरा येथील पंडित दीनदयाल हिंदी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. 

बुधवारी (दि. 24) भोपाळ स्थित विद्यापीठाच्या कार्यक्रमात ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी मध्य प्रदेशचे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश देवेंद्रकुमार जैन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदुभूषण मिश्रा उर्फ देवेन्दू हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मध्य प्रदेश लोक शिक्षण संचनालय अप्पर निदेशक (सेवानिवृत्त) पंडित धीरेंद्र चतुर्वेदी, मध्य प्रदेश मुख्यमंत्री उदय योजनेचे तांत्रिक शिक्षा विभागाचे प्रभारी विष्णुकांत कनकने, दुर्ग येथील पर्यावरण तज्ञ तसेच पं. दीनदयाल विद्यापीठाचे ब्रँड अँम्बेसिडर डॉ. विश्वनाथ पाणिग्रही हे उपस्थित होते.

 

कुलगुरू डॉ. मिश्रा म्हणाले, ‘देशातील विविध क्षेत्रात म्हणजेच हिंदी भाषा लेखन, पर्यावरण जागरूकता, चिकित्सा सेवा, जल संरक्षण, विधी सहायता, नागरी सुरक्षा, तसेच सामाजिक सेवा क्षेत्रात केलेल्या विशेष व उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पदवीदान समारंभ होत आहे. देशातील विद्वान अशा ह्या सर्व पदवी प्राप्त निवड झालेल्या सन्मानित सदस्यांचे अभिनंदन. या सर्वांनी राष्ट्र भाषेच्या प्रसारासाठी  तसेच समाजसेवेसाठी असेच कार्यरत राहावे.

देशातील विविध प्रांतातून आलेल्या उपस्थितांकडून संस्थांच्या ब्रँड अँबेसिडर डॉ. विश्वनाथ पाणिग्रही यांनी केंद्र शासनाच्या मतदाता जागरूकता अभियानाच्या अंतर्गत शत प्रतिशत मतदानासाठी शपथ घेतली. विद्यापीठाच्या वतीने देशातील विविध भागातील निवड झालेल्या गणमान्य व्यक्तींचा पदवी देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यापीठ समारंभ समितीकडून उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पुणे येथील विजयकुमार पाटील यांना भाषा लेखन तसेच 25 वर्षाच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट (पीएचडी) पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य पंडित जानकी वल्लभ शास्त्री यांनी केले. संजय शर्मा तसेच डॉ. प्रकाश यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.