PCMC : नालेसफाईची  कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करा; आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज – पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही ( PCMC ) यासाठी शहरातील नालेसफाई व पावसाळी गटर्स सफाईची सर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करावीत. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने  परिस्थिती हाताळावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना  दिले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी तसेच आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांसंबधी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या तसेच आपत्कालीन परिस्थिती याबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. तसेच त्या अनुषंगाने विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा आणि नियोजन याबद्दल माहिती घेण्यात आली. त्यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिका-यांना कामकाजाबाबत आदेश दिले.

Pune : अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, ज्ञानदेव जुंधारे, मनोज सेठिया,संजय कुलकर्णी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे,  उपआयुक्त अण्णा बोदडे,मनोज लोणकर, रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, डॉ. अंकुश जाधव, अमित पंडित, राजेश आगळे, उमेश ढाकणे, सीताराम बहुरे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, बापूसाहेब गायकवाड, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने उपस्थित अधिका-यांना आदेश व सूचना दिल्या. पूर परिस्थितीत तातडीने घटनास्थळावर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणावी. पूर परिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा. पावसाळ्यात पाण्याच्या  पातळीत वाढ होते, त्यामुळे सर्व यंत्रणा सुसज्ज असणे गरजेचे आहे. आपत्ती काळात कोणत्याही गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी  मार्गदर्शक सूचना  तयार करून नागरिकांमध्येही त्याबाबत जनजागृती करावी.

शहरातील नालेसफाईच्या कामांना गती द्यावी. पाणी कोठेही तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. नदीकाठी असणा-या लोकवस्तीत पाणी शिरण्याच्या घटनांवर लक्ष ठेवावे. दुर्घटना टाळण्यासाठी सातत्याने या भागाची पाहणी करणे आवश्यक असून पूरबाधित व्यक्तींसाठी अन्न, निवास आदी सुविधांसह सर्व आवश्यक असणा-या साधनसामग्रीची पूर्वव्यवस्था करावी, असे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले.

ज्या भागात पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्यासाठी तेथील नागरिकांचे स्थलांतर कुठे करावे याबाबत पूर्वतयारी करावी. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत,  तसेच हे क्रमांक 24*7 सक्रीय असतील याची दक्षता घ्यावी. वेळप्रसंगी वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवावी. धोकादायक इमारतींची पाहणी करावी तसेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डींग्सची पाहणी करून ते काढण्यात यावेत. धोकादायक वृक्षांची वेळेत छाटणी करावी आदी सूचना देखील आयुक्त सिंह यांनी यावेळी ( PCMC ) दिल्या .

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.