Pune : दुसऱ्या अस्मिता महिला ऍथलेटिक्स लीगमध्ये रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण पदके

एमपीसी न्यूज – खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यातील बाबुराव सणस मैदानावर काल आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अस्मिता महिला ऍथलेटिक्स लीग शहर आणि विभाग स्तरावरील स्पर्धेत पुण्याच्या रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली. रुजुला भोसले हिने 100 आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तर साक्षी बोऱ्हाडे हिने 800 आणि 150 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली.

Pimpri Chinchwad : कै.तुकाराम तनपुरे फॉउंडेशन गणेशोत्सवात करते विविध सेवाकार्य

भारतीय क्रीडा प्राधिकरण मुंबई केंद्राने महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून मिळून एकंदर 85 ऍथलेट सहभागी झाले होते. 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर आणि 1500 ते 5 हजार मीटर धावण्याबरोबरच लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक अशा विविध 14 प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. अन्य क्रीडा प्रकारातील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रिषिका शेट्टी हिने तर 5 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत विजयालक्ष्मी कटारे हिने सुवर्ण पदक पटकावले.

लांब उडी क्रीडा प्रकारात शिल्पा जवाराजन, गोळाफेक मध्ये अमृता कटके, थाळीफेक स्पर्धेत अमीरा शाह आणि भालाफेक स्पर्धेत ईश्वरी धंगेकर यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. भर पावसात झालेल्या या स्पर्धेला पुणेकर क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या शकुंतला खटावकर, गुरुबन्स कौर, रेश्मा पाटील आणि राखी गौड यांच्यासह अनेक महिला खेळाडू देखील यावेळी आवर्जून उपस्थित होत्या. महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड, सरचिटणीस सतीश उच्छिल, पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चवधरी आणि कुस्ती प्रशिक्षक बबिता सणस, वरुण त्यागी यांनी देखील यावेळी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

देशभरातील महिला खेळाडूंना त्यांची ओळख निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी आणि क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू असल्याचे सतीश उच्छील यांनी सांगितले. खेलो इंडिया योजनेअंतर्गत यापूर्वी सलग दोन वर्षे आयोजित करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या स्पर्धांमधून देशभरातील सुमारे 25 हजार महिला खेळाडू सहभागी झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.