Pune : महात्मा गांधीच्या विचाराचा प्रसार करणार्‍या गणेशमंडळांसाठी स्पर्धा

१ लाखाचे प्रथम पारितोषिक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र गाधीं स्मारक निधीतर्फे गांधी विचार पुढे नेणार्‍या गणेश मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्माचे हे 150 वे वर्ष असल्याने गणेशोत्सवादरम्यान ही स्पर्धा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पत्रकाद्वारे दिली.

पुणे शहरात गणेशोत्सवात जी गणपती मंडळे राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचे देखावे, व्याख्याने ठेवतील, किंवा अन्य काही नाविन्यपूर्ण गोष्टी करतील. अशा मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

प्रथम क्रमांकास एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. गणेशात्सवात अधिक उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या गणेश मंडळाला दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.

नाविन्य, परिणामकारकता काळानुरूप योग्य संदेश, ऐतिहासिक अचूकता हे स्पर्धेसाठी निकष असतील. आजच्या संदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा कोणता राष्ट्रीय विचार, कोणत्या प्रसंगातून अधोरेखित करणे आवश्यक आहे, याची निवड हा पारितोषिकासाठी महत्त्वाचा निकष असेल, असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.

पारितोषिक निवड समितीद्वारे स्पर्धेचे परीक्षण होईल आणि निकाल जाहीर करण्यात येईल. इच्छुक गणेश मंडळांनी ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, सर्व्हे नंबर. 36 गांधी भवन, कोथरूड, पुणे 38 या संस्थेकडे अर्ज करावेत. संस्थेकडे अर्ज सादर होतील तेवढ्या गणेश मंडळांना निवड समिती प्रत्यक्ष भेट देईल.

गणपती विसर्जनानंतर 15 दिवसांत पारितोषिक जाहीर केली जातील. त्यानंतर महिनाभरात पारितोषिक वितरणाचा जाहीर समारंभ होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.