Pune : रिक्षाचालकांचा खून करून गुलबर्गा येथून फरार झालेल्या दोघांना पुण्यात अटक

एमपीसी न्यूज- किरकोळ वादातून रिक्षाचालकाचा गुलबर्गा येथे खून करून फरार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट1 च्या पथकाने मध्यरात्री पुण्यातून अटक केली आहे. दारू पिण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.

सचिन रवींद्र मिलिनकरी (वय 24, रा. कृष्णा कॉलनी, गुलबर्गा), रेवना सिद्रप्पा दंगपूर (वय 25, रा. संतोष कॉलनी, गुलबर्गा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जावेद (पूर्ण नाव समजले नाही )असे खून झालेल्या रिक्षाचालकाने नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिण्यावरून झालेल्या वादातून आरोपी व त्यांच्या साथीदारांनी मिळून जावेदचा खून केला होता. खून करून ते फरार झाले होते. फरार झालेले दोन आरोपी पुण्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली. त्यावरुन या आरोपीची माहिती घेऊन वरिष्ठ पोलीसनिरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, सचिन जाधव, रिजवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, प्रशांत गायकवाड, सुधाकर माने या पथकाने या आरोपींना लोहगाव येथे शोध घेऊन अटक केली. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.

दारु पीत असताना झालेल्या वादातून जावेदला मारहाण करुन दगडाने ठेचून मारले व मृतदेह कलबुर्गी बिदर रेल्वे लाईनच्या कडेला टाकून पळून आलो अशी कबुली त्यांनी दिली. बुधवारी दुपारी लोहगाव येथील मित्राकडे आले होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.