Pune : माहिती अधिकार दिन 27 किंवा 29 सप्टेंबर रोजी साजरा करावा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिवस साजरा केला जातो. मात्र या वर्षी 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणाची सुट्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहिती अधिकार हक्काचे महत्व कायम राहावे म्हणून माहिती अधिकार दिन 28 ऐवजी 27 किंवा 29 सप्टेंबर रोजी साजरा करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रदीप नाईक यांनी पुण्याचे (Pune)  जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना नाईक यांच्यासमवेत ललित ससाणे हे देखील होते.

Pimpri : स्वच्छता विषयक कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिर

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रचार व प्रसार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे की 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून शासकीय कार्यालयात साजरा केला जावा.

शासन निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सुचविले आहे.

शासकीय कार्यालयात व अधिनिस्त असलेल्या सर्वच शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी. मात्र या वर्षी 28 सप्टेंबर या दिवशी अनंत चतुर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणाची सुट्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 सप्टेंबर या दिवशी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा 27 सप्टेंबर या दिवशी किंवा 29 सप्टेंबर या दिवशी साजरा करावा, तसेच तशा सूचना आपल्या अधिनिस्त सर्व शासकीय कार्यालयांना तातडीने कराव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.