Talegaon News: कलापिनीच्या ‘अमृत संजीवनी’ नृत्यनाट्याने प्रक्षकांना केले मंत्रमुग्ध!

एमपीसी न्यूज (विश्वास देशपांडे) – ‘योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी… ‘ अशी अनुभूती देणारा, भक्ती रसात चिंब न्हायलेला आणि रसिकांना पंढरीच्या वारीचा अनुभव देणारा ‘अमृत संजीवनी’ या दोन अंकी नृत्यनाट्याचा भव्य दिव्य प्रयोग कलापिनी सांस्कृतिक केंद्रात नुकताच संपन्न झाला. या नृत्यनाट्याने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले.

कलापिनी निर्मित, सृजन नृत्यालय प्रस्तुत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आणि अभंगांवर आधारित दोन अंकी नृत्यनाट्य ‘अमृत संजीवनी’ कलापिनी सांस्कृतिक केंद्रात सादर झाले. माउलींच्या 725 व्या संजीवन सोहळ्या निमित्त, जवळपास 70 कलाकारांच्या संचात नाटकाचा 27 वा प्रयोग झाला. पुणे, फलटण, औरंगाबाद, नेवासे, अहमदनगर, आळंदी तसेच ऑस्ट्रेलियामध्ये या नृत्यनाट्याचे प्रयोग झाले आहेत.

‘अमृत संजीवनी’चा प्रयोग म्हणजे एक कलात्मक अनुभूती होती. डोळे, कान आणि मन यांना एकचवेळी खिळवून ठेवणारा हा एक अतिभव्य आणि सुंदर अनुभव होता. ज्ञानदेवांसारख्या दैदीप्यामान विभुतींचे चरित्र  लोकांपर्यंत पोहोचविणारी कलाकृती कलापिनी सांस्कृतिक केंद्रात रसिकांनी अनुभवली.

डोळ्यात कायमची साठवून ठेवावी, अशी ती नाद, शब्द, रंग आणि ताल यांचा अद्भू्त संगम असणारी एक भव्य कलाकृती होती. एकाचवेळी इतक्या नृत्यांगना मनोहारी रंगसंगती साधणाऱ्या पोशाखात रंगमंचावर नाद मधुर संगीताच्या तालावर अत्यंत सुंदर पदन्यास करत होत्या.

त्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या नृत्याविष्कारातून एक सतत बदलणारा आकृतिबंध डोळ्यांना, कानांना आणि हृदयाला एक अनोखा अमृतानुभव देत होता आणि प्रेक्षकांना ज्ञानेश्वर माउलींच्या प्रेमळ हृदयाचे आणि दैदीप्यामान बुद्धिमत्तेचे दर्शन घडवीत होता.

यावेळी दूरदर्शनचे निर्माते निरंजन पाठक, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, डॉ. अनंत परांजपे, अंजली सहस्रबुद्धे, संजय मालकर, विनायक भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. दूरदर्शन केंद्रात या नाटकाचे चित्रीकरण 24 नोव्हेंबर रोजी झाले. याचे प्रसारण 5 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

अमृत संजीवनी या नाटकाची संकल्पना, लेखन आणि नृत्य रचना मीनल कुलकर्णी यांच्या आहेत. संगीत विनायक लिमये यांनी दिले आहे. नेपथ्य केदार अभ्यंकर, मंदार थिटे आणि विराज सवाई यांनी केले होते. प्रकाश योजना विनायक काळे, गजानन वाटाणे, अभिलाष भवार यांनी केली होती.

ध्वनी व्यवस्था सुमेर नंदेश्वर यांची होती. पार्श्वगायन संजीव मेहेंदळे, संपदा थिटे, विनायक लिमये , श्रुती देशपांडे, प्रणव केसकर आणि डॉ. सावनी परगी यांनी केले होते. पार्श्वसंगीत स्वच्छंद गंदगे यांनी केले. अरविंद सूर्य, केदार सोनपाटकी यांनी रंगभूषा केली.

राजीव कुमठेकर, अनिश रिसबूड, ऋग्वेद अराणके, सुचिर देशमुख, श्रीमय कुलकर्णी, मनवा वैद्य, मिहीर देशपांडे, चैतन्य जोशी, सोहम पवार, मृदुला जोशी, कौस्तुभ ओक,  डॉ. विनया केसकर, मीनल कुलकर्णी, अनुपमा रिसबूड, प्रतीक मेहता, कामिनी जोशी, अवनी परांजपे, चेतन पंडित, गंधार जोशी, संदीप मन्वरे, हृतिक पाटील, प्रणव केसकर, हरीश पाटील, समा भावसार, दक्षा ओक, विधी जायगुडे, यशदा जोशी, अभिज्ञा कुलकर्णी, अंकिता कुचेकर, शरयू पवनीकर , प्रणोती पंचवाघ, गायत्री रानडे, सुप्रिया नायर, कौमुदी जोशी, पूजा कडवे -कुलकर्णी, अनुजा झेंड , हरीज्ञा बांदल, शामली देशमुख, तेजस्विनी गांधी, मुक्ता भावसार, स्फूर्ती शेट्टी, अदिती अरगडे, सिद्धी शहा या कलाकारांचा नृत्यनाट्यात सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.