Pimpri News : चाकूने वार करत तरुणास लुटले; तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पायी चालत जात असलेल्या एका तरुणाला एका अनोळखी व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिला असता अनोळखी व्यक्तीने चाकूने वार करत तरुणाचा मोबाईल फोन आणि रोकड जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास आंबेडकर चौकाजवळ पिंपरी येथे घडली.

किशोर गणपती पाटील (वय 29, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी रात्री साडे सात वाजताच्या सुमारास पिंपरी मार्केट येथून मोबाईलला नवीन कव्हर बसवून पायी चालत घरी जात होते. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ते टायसन ग्रुप कंपनीच्या गेट समोर असलेल्या एका गल्लीत लघुशंकेसाठी गेले. त्यावेळी आरोपी व्यक्ती तिथे आला.

‘तुझ्याकडे जितके पैसे आहेत ते मला चुपचाप दे. नाहीतर तुझा कोतळाच बाहेर काढतो’, असे धमकावत आरोपीने फिर्यादी पाटील यांना शिवीगाळ केली. पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला असतात आरोपीने पाटील यांच्या दंडावर, डोक्यात, हातावर, पायावर चाकूने वार केले. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपीने पाटील यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि दोनशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.