रुबिक्स क्यूब सिनेमाचा फर्स्ट लूक सलमानच्या उस्थितीत लाँच

एमपीसी न्यूज – रुबिक्स क्यूब या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते ते यारोंका यार सलमान खान याची उपस्थिती. महेश मांजरेकर यांचा जिगरी मित्र असलेल्या सलमान खानच्या हस्ते सिनेमाच्या संगीताचे अनावरण करण्यात आले.

सलमानची मैत्रीण युलिया वंतूर हिने या सोहळ्यात सादर केलेले नृत्यही उपस्थितांची दाद मिळवून गेले. या भव्य सोहळ्यासाठी मराठी सृष्टीतले अवघे तारांगण अवतरले होते. मराठी सिनेमा, त्यातला आशय आणि तो सादर करण्याची पद्धत गेल्या काही महिन्यात कमालीची बदलते आहे. पण तो सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो अशी अनेकांची ओरड होती. हाच मुद्दा लक्षात घेऊन आपला सिनेमा अधिक चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा चंग बांधत अभिनेते, निर्माता – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पुढाकार रुबिक्स क्यूब या सिनेमाच्या निमित्ताने घेतला. 

अनेक नव्या तरुण कलाकारांसह दिग्गज कलावंतांनाही आपल्या उपस्थितीने या म्युझिक लाँचला चार चांद लावले होते. रंजक कथा, उत्तम दिग्दर्शन आणि आकर्षक लोकेशन्स हे या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. रुबिक्स क्यूब या सिनेमाची कथा नावाप्रमाणेच वेगळी आहे. ही संपूर्ण कथा परदेशात घडते. आजवर फक्त बॉलिवूड सिनेमांमध्ये बघितलेलं युरोपचे निसर्ग सौंदर्य रुबिक्स क्यूबमुळे मराठी सिनेमातही बघता येईल. हा संपूर्ण सिनेमा स्लोव्हेनिया, इटली, आणि स्वित्झर्लंड येथे चित्रित केला आहे.

मृण्मयी देशपांडे, गश्मीर महाजनी, सुरभी भोसले आणि सिद्धांत मुळ्ये या नव्या दमाच्या कलाकारांसह किरण यज्ञोपवीत, संदीप पाठकसारखे अनुभवी आणि मेधा मांजरेकर व महेश मांजरेकर या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे तर फ्रेश संवाद इरावती कर्णिक यांनी लिहिले आहेत. युरोपचे निसर्गसौंदर्य, कलाकारांचा अभिनय सिनेमाची कथा आणि भव्य संगीत ही  या सिनेमाची बलस्थाने आहेत.

या सिनेमाच्या माध्यमातून नव्या दमाचा संगीतकार विशाल मिश्रा हा मराठी चित्रसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. सिनेमाचे निर्माते अविनाश अहाले याबद्दल बोलताना सांगतात की, मराठी सिनेमा बदलाच्या दिशेने जात असताना त्यात माझा हातभार लागणे हे मी माझे सुदैव समजतो. तर आधीच्या सगळ्या सिनेमांपेक्षा काही तरी वेगळे करावे ही माझी इच्छा होती. नशिबाने तशी कथा लिहिली गेली. आणि ती कथा सत्यात उतरवण्यासाठी निर्मात्याचे पाठबळही मला मिळाले. हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्वाकांक्षी आहे, असे मत महेश मांजरेकर यांनी सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या वेळी व्यक्त केले. 

अहालेस मूवी मॅजिक आणि महेश मांजरेकर मूवीज यांची निर्मिती आणि जी. बी. एंटरटेन्मेन्ट प्रा. लि. यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाची भव्यता बहारदार लोकेशन्स, Grand Music आणि दमदार स्टारकास्ट आणि सलमानच्या खास शुभेच्छांमुळे Rubiks Cube (रुबिक्स क्युब) ची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.