यंदाच्या भीमथडी जत्रेत उलगडणार आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू

2 मार्च पासून शिवाजीनगर येथील अॅग्रीकल्चरल मैदानावर प्रारंभ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या संस्कृतीत ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा एक सणच असतो. पुण्यात दरवर्षी आयोजीत केली जाणारी भीमथडी जत्रा हा देखील एक आनंदाचा सण म्हणूनच ओळखली जाते. यावर्षीची भीमथडी जत्रा येत्या 2 ते 5 मार्च दरम्यान शिवाजीनगर येथील अॅग्रीकल्चरल महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

या जत्रेचे हे अकरावे वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन सादर होणा-या जत्रेची यावर्षीची थीम ही आदिवासी संस्कृतीचे केंद्र आहे. यंदाच्या जत्रेचे खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे ‘आदिवासी संस्कृती केंद्र’. त्यासाठी भीमथडी जत्रेत पालघर, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट या भागातील आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. तसेच विविध आदिवासी भागातील आदिवासींनी तयार केलेले उत्पादने, हस्तकला वस्तू , हातमाग, आदिवासी वनऔषधी , आदिवासी चित्रशैली यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री असणार आहे.

यावर्षीच्या भीमथडी दरम्यान सांगतिक कार्यक्रम / कॉन्सर्ट्‌स देखील आयोजन करण्यात आले आहे. संत कबीरांचे दोहे आपल्या खास ‘युथफुल’ शैलीत सादर करणारा ‘कबीर कॅफे’ हा बॅन्ड आपली संगीत कला भीमथडी जत्रेत सादर करणार आहे. देशातील लोकसंस्कृती, लोकसंगीत  आणि रॉक म्युझीक यांचा आगळ -वेगळा आणि कल्पक मिलाप करून ‘माटीबानी’ हा बॅन्ड आपली कला सादर करणार आहे. महाराष्ट्रातल्या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी ‘जागर लोक संस्कृतीचा’  या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर सादर होणा-या विविध कार्यक्रमाची तिकीटे www.bookmyshow.com संकेतस्थळावरून  कन्फर्म करण्याची सोय आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

वाढत्या वाहतुकीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी भीमथडी जत्रेने ‘UBER’ या वाहतूक सेवा कंपनीशी करार केला आहे. यात तुम्ही पुण्यातील कोणत्याही भागातून भीमथडी जत्रेला येण्यासाठी  ‘UBER’ टॅक्सी बुक केल्यास 30 टक्के प्रवास भाड्याची सुट देण्यात आली आहे.  यासाठी तुम्ही ‘JATRA17’ हा कोड ‘UBER’ बुक करताना वापरावा, अशी माहिती यावेळी आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.