विधानसभेसाठी बाबूराव वायकर हे समांतर राष्ट्रवादीचे उमेदवार – माऊली दाभाडे

‘मला पक्षातून काढण्याचा चिलटांना अधिकार नाही’

‘समांतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लवकरच नोंदणी’

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे जिल्ह्यातील कारभार व नियुक्त्या  याच मूळात घटनाबाह्य आहेत, असा सनसनाटी आरोप करीत मावळातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. आपण पक्षाचे प्रांतिकचे क्रियाशील सदस्य असल्याने आपल्याला पक्षातून काढण्याचा या चिलटांना काहीच अधिकार नाही, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. समांतर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची लवकरच निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात येणार असून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर हे पक्षाचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असतील, अशी घोषणाही त्यांनी केली.  

पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून माऊली दाभाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा ठराव शनिवारी वडगाव मावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर दाभाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.  निवडणुकीपूर्वी आपण पक्षाचा  राजीनामा देऊन समांतर राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केलेली असल्याने हकालपट्टीचा प्रश्नच कुठे येतो, असा सवाल दाभाडे यांनी केला. 

भाजपचा परंपरागत बालेकिल्ला असणाऱ्या वडगाव-खडकाळा गटात विजय मिळवून वायकर यांनी इतिहास घडवला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तेच समांतर राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी घोषणा त्यांनी केली. 

समांतर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची येत्या आठ-दहा दिवसांत निवडणूक आयोगाकडे प्रादेशिक पक्ष म्हणून नोंदणी होईल. प्रारंभी या पक्षाचे कार्यक्षेत्र मावळ तालुका असेल. त्यानंतर जिल्हा आणि राज्य पातळीवर कार्यविस्तार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शरद पवार साहेब यांच्याच विचारांचा आपल्यावर प्रभाव असून अजित पवार यांना आपण आदर्श मानतो, असेही ते म्हणाले. 

माजी मंत्री मदन बाफना प्रचाराला आल्यामुळे बाबूराव वायकर यांचा विजय निश्चित झाला, अशी टिप्पणी दाभाडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व तालुक्यातील नेते व पदाधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधोगतीला हीच मंडळी कारणीभूत असून आपल्या हकालपट्टीचा ठराव करण्याऐवजी पहिल्यांदा जिल्हाध्यक्षाचीच हकालपट्टी करायला हवी होती, असेही ते म्हणाले. 

पत्रकार परिषदेस नारायण ठाकर,  दत्तात्रय पडवळ, अंकुश आंबेकर, तुकाराम आसवले,  दत्तोबा आंद्रे, शांताराम लष्करी, विठ्ठल जाधव,  कैलास गायकवाड, कैलास खांडभोर, सुनील दाभाडे, बाबूराव येवले, गणेश दाभाडे, सिद्धार्थ दाभाडे आदी उपस्थित होते.
 
"advt"
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.