Vadgaon maval – गडभटकंती ग्रुपने केली दुर्गसंवर्धन करून शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील गडभटकंती ग्रुपतर्फे वारंवार गडस्वच्छतेच्या तसेच गड संवर्धनाच्या विविध मोहीमा राबविण्यात येतात. याच ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या जयंतीनिमित्त किल्ले तिकोणागड येथे दुर्गसंवर्धन मोहीम काढण्यात आली. या मोहिमेत तिकोणागडावरील ऐतिहासिक वास्तूंजवळ माहिती फलक लावणे, पर्यटकांसाठी दिशादर्शक फलक लावणे आणि स्वच्छता करून शिवजयंती साजरी करण्यात आली. 

शिवजयंती दुर्गसंवर्धन मोहिमेची मागील पाच दिवसांपासून जय्यत तयारी सुरु होती. यामध्ये किल्ल्यावरील माहितीफलक तयार करण्यात आले. दिशादर्शक फलक बनविण्यात आले. तसेच आपत्कालीन मदतीसाठी लागणारे साहित्यही जमविण्यात आले. माहितीफलक लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आले. गडावरील काही फलक जुने असल्याने त्यास छिद्र पाडण्याची गरज असल्याने जनरेटर आणले. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता गडभटकंती ग्रुपचे सर्व मावळे तिकोणागडाच्या पायथ्याला जमले. खड्डे खणण्यासाठी आदल्या दिवशी गडावर गेलेले काही मावळे गडावरच मुक्कामी थांबले. 

छत्रपती शिवाजी महाराज कि जय ! जय भवानी ! जय शिवाजी ! अशा जयघोषात मोहीम सुरु झाली. सकाळी गडपाथ्यापासून फलक लावण्यात आले. फलक, जनरेट घेऊन गडमार्गावर निश्चित केलेल्या ठिकाणी फलक लावत लावत गडमाथ्यावरील शेवटचा फलक लावला. त्यानंतर गडावरील जुना भगवा झेंडा काढुन त्या ठिकाणी नवीन झेंडा लावण्यात आला. गडमाथ्यावरील श्री वितंडेश्वराचे मंदिर स्वच्छ करून मंदिरात पूजा करण्यात आली.  तसेच गडावरील चपेटदान मारूती, वेताळ महाराज व तळजाई माता मंदिरातही हार घालुन पूजा करण्यात आली. 

स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या मावळ्यांसाठी गडावरच नाष्ट्याची सोय करण्यात आली. नाष्टा झाल्यावर जनरेटर घेवुन खाली आणण्यात आला. गडपायथ्याशी लावलेल्या मोठ्या माहिती फलकाजवळ शिवप्रतीमेचे पूजन व फलक अनावरण करण्यात आले. शिवप्रतीमेचे पूजन महेश प्रिंटर्सचे मालक श्रीनिवास कुलकर्णी व कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. माहितीफलकाचे अनावरण श्रीनिवास कुलकर्णी व विशाखा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. 

गडावर आपातकालीन मदतीसाठी लागणारे प्रथमोपचाराचे साहित्य गडपाल माऊली मोहळ व गडपाल पुंडलीक मोहळ यांच्याकडे देण्यात आले. अशी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या दुर्गसंवर्धन मोहिमेची सांगता करण्यात आली. तिकोणागडावरील दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभागी होण्यासाठी गणेश जाधव (9850314384), अवधुत धामणकर (7755995962), श्रीनीवास कुलकर्णी (9822788859), अक्षय औताडे (9604091187) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

"WhatsApp

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.