पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेल्या ज्येष्ठाचा मृत्यू; पत्नी, जावयावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लुटून पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा आज (गुरुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पत्नी, जावयासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.7) भरदुपारी अडीचच्या सुमारास नाशिक फाटा येथे घडली होती. 

उद्धव आसाराम उनवणे (वय 65, रा. आळंदी, मूळ रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सुमन उद्धव उनवने आणि जावाई ज्ञानेश्वर जयंत महाले यांच्याहसह इतर तिघांविरोधात भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव उनवणे हे बुधवारी नाशिकवरुन पैसे घेऊन वल्लभनगर बस स्थानकात आले होते. वल्लभनगर स्थानकातून ते नाशिक फाट्याकडे जात होते. त्यावेळी पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांना तुम्ही उनवनेच काय असे विचारले आणि मारहाण केली.

त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड काढून घेतली आणि डोक्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन पोबारा केला. पत्नी सुमन आणि जावाई ज्ञानेश्वर यांनीच मारहाण करायला लावले असल्याचे  फिर्यादीत नमूद केले आहे.  यामध्ये उनवने गंभीर भाजले होते. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.