पारदर्शक कारभारासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेवर उपलोकपाल नेमावा – बहल

एमपीसी न्यूज – पारदर्शक कारभारासाठी मुंबई महापालिकेवर उपलोकपाल नेमण्याच्या भाजन सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे. मुंबईप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेवरही उपलोकपाल नेमण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते योगेश बहल यांनी केली आहे.

 

भाजपची सत्ता असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने पारदर्शक कारभार करून दाखवावा. त्यासाठी महापालिकेवर उपलोकपाल नियुक्त करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही राहील, असे ते म्हणाले.

 

महापालिकेचा कारभार पारदर्शी पद्धतीनेच झाला पाहिजे. यासाठी विरोधी पक्ष म्हणून चोख भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस बजावेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने शहरात विकासकामे केली. मात्र, जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. जनमताचा कौल आम्हाला मान्य असून, विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेतल्यास ते हाणून पाडले जातील, असे बहल म्हणाले.

 

ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवत गटनेते पदाची जबाबदारी सोपवली आहे, ती समर्थपणे पेलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असेही त्यांनी सांगितले.

 

शहराच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवली जाईल. शहरातील विकास कामांचा वेग कायम राहील याची दक्षता घेण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रशासनाला सहकार्य केले जाईल, असेही बहल यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.