पिंपरी-चिंचवड महापौर उमेदवारीवरून भाजपमध्ये ‘घमासान’

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला नेस्तनाबूत करून पिंपरी-चिंचवडमध्ये बहुमत मिळविलेल्या भारतीय जनता पक्षात महापौरपदाचा उमेदवार ठरविण्यावरून जोरदार ‘घमासान’ सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पक्षांतर्गत संघर्षात कोणाची सरशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी आज (गुरुवार) दुपारी तीन ते पाच दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. ती वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्यानंतरही उमेदवाराच्या नावाबाबत निर्णय होऊ शकत नसल्याने इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
उमेदवार निश्चितीसाठी बुधवारी रात्री मुंबईत झालेल्या बैठकीत नेत्यांमध्ये जोरदार ताणाताणी झाल्याचे वृत्त आहे़. चिंचवड का भोसरी, निष्ठावंत की नवा चेहरा, दादांचा की भाऊंचा, अनुभवी की पहिल्यांदाच निवडून आलेला, अशा विविध मुद्द्यांवर सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे तिढा आणखीच वाढला आहे.
महापौरपदासाठी नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, नितीन काळजे, संतोष लोंढे, राहुल जाधव व केशव घोळवे या सहा नावांची चर्चा असून वाद विकोपास गेल्यास अनपेक्षित नाव सुद्धा पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज दुपारपर्यंत तोडगा न निघाल्यास भाजपतर्फे एकापेक्षा जास्त उमेदवारांना अर्ज दाखल करायलाही सांगितले जाऊ शकते. महापौर निवडणूक 14 मार्चला असल्याने तोपर्यंत उमेदवाराच्या नावावर एकमत घडविण्यासाठी वेळ मिळू शकतो, असा मतप्रवाह भाजपमध्ये दिसून येत आहे.