वडगाव मावळमध्ये दीड लाखांचा गुटखा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील ममता मिनी मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत 1 लाख, 41  हजार, 120 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.8) दुपारी करण्यात आली. मावळमधील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी 7 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या कारवाईने राजरोसपणे चाललेल्या गुटखा विक्रीला चांगलाच दणका बसला आहे.

अन्न व औषध प्रशासन अधिकारी गणपत कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ येथील ममता मिनी मार्केटमध्ये दुकान मालक मिलिंद चंपालाल बाफना याने रजनीगंधा, आर.एम.डी, राज कोल्हापूरी पान मसाला, गोवा गुटखा, सुगंधी तंबाखू, विमल पानमसाला या विक्रीस व साठवणुकीस बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून केल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने त्याच्या दुकानावर कारवाई केली.

गुटखा विक्री प्रकरणी मिलिंद बाफना यांच्यावर वर्षातील ही दुसरी कारवाई असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या याच दुकानातून सात लाखाचा  गुटखा जप्त करण्यात आला होता. अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे, देवानंद वीर व नमुना सहाय्यक अधिकारी जयेश कदम यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.