Pune Loksabha : वर्तमान परिस्थितीमध्ये देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही- माजी नगरसेविका अश्‍विनी लांडगे

एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांसह माजी नगरसेविका अश्विनी लांडगे यांचा पुण्यात काँग्रेसमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – “आजच्या आधुनिक भारतात राजकारणाची पातळी अत्यंत खराब होत चालली असून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळेच वर्तमान परिस्थितीमध्ये काँग्रेसशिवाय(Pune Loksabha) अन्य दूसरा कोणताही योग्य पर्याय समोर दिसत नाही,” असे प्रतिपादन एमआईएमच्या माजी नगरसेविका अश्‍विनी लांडगे यांनी आज दि.(8 मे) रोजी केले.

 

काँग्रेस भवन,पुणे येथे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये एमआईएमच्या पुणे मनपाच्या माजी नगरसेविका व समाज सेवक डॅनियल लांडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, नागपुर पदवीधर क्षेत्राचे आमदार अभिजीत वंजारी, चंद्रपूरचे जिला काँग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, प्रचार प्रमुख मोहन जोशी, सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी,  प्रसार माध्यम समन्वयक राज अंबिके व अन्य उपस्थित होते.

माजी नगरसेविका अश्‍विनी लांडगे यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे निवडणुकीच्या सहा दिवस आधी एमआईएमला मोठा धक्का बसला आहे. तसेच,काँग्रेस पक्षाची वडगावशेरी मतदारसंघात ताकत आणखी वाढली आहे. यासोबतच 4 अपक्ष उमेदवारांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये सुरेशकुमार ओस्वाल, डॉ. सलीम बागबान, किरण रायकर आणि सलीम सय्यद यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेल्या अपक्ष उमेदवारांनी म्हटले आहे की, सद्य परिस्थितीमध्ये लोकशाही व्यवस्था आणि सर्व स्वायत्त संस्थांची स्वायत्तता टिकणे अतिशय महत्वाचे आहे.आमच्या उमेदवारीमुळे भाजप महायुती विरुद्धच्या मतांचे विभाजन होऊन भाजप उमेदवार निवडून येण्याचा धोका वाटतो. सदर बाब लक्षात घेऊन आम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत. तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित पँथर यांनीही उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला आहे

काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर अश्‍विनी लांडगे म्हणाल्या, सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण अत्यंत प्रदूषित आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची विचारधाराच देशाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळेच भविष्याचा विचार करून सर्व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांपासून मी एमआईएममध्ये काम केले आहे, मात्र वर्तमान परिस्थितीचा विचार करून संविधान वाचविण्यासाठी मतांची विभागणी होऊ नये. तसेच सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. आम्ही अगदी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी काम करत आहोत, त्यामुळे लोकांचा कल व नागरिकांची अपेक्षा लक्षात घेऊनच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

संविधानाने आपल्याला दिलेली ताकद कायम रहावी म्हणून प्रयत्न करणार आहे. या निवडणुकीत रविंद्र धंगेकरच पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयाचा झेंडा फडकवतील,असा विश्‍वास त्यांनी(Pune Loksabha) यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.