कामगारांच्या अस्तित्वासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू – सचिन अहिरे


एमपीसी न्यूज – कामगारांच्या अस्तित्वावर कितीही संकटे उभी राहिली तरी त्या संकटांना सर्वशक्तीनिशी सामोरे जाऊन कामगारांचे अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करू. हा प्रयत्न करताना रस्त्यावर जरी उतरावे लागले तरी चालेल, असे मत कामगार नेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन लोणावळा येथे पार पडले. या अधिवेशनात कामगारांना मार्गदर्शन करताना अहिरे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुनील अहिर, निवृत्ती देसाई, शशिकांत हडकर, शिवाजी काळे, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, विजय काळोखे, बजरंग चव्हाण, जी. बी. गावडे, उत्तम गीते, संजय कदम, संतोष बेंद्रे, लक्ष्मण तुपे, साईकुमार निकम आदी उपस्थित होते. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, पुणे, कोल्हापूर इत्यादी शहरातील जवळपास 130 पेक्षा अधिक कारखान्यातील कामगार मेळाव्यासाठी उपस्थित होते.

गुजरातमध्ये कारखानदारी वाढावी यासाठी विविध स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रोजंदारीवर गदा येण्याची मोठी भीती आहे. महाराष्ट्रातील रोजगार वाढीसाठी देखील विविध स्तरावर प्रयत्न व्हायला हवे. कामगार आपले कौशल्य पणाला लावून अस्तित्व टिकवत आहेत. आज परिस्थिती अशी आहे की कारखाना टिकला तर रोजी टिकेल आणि कामगार जगला तर युनियन टिकेल, असेही अहिरे म्हणाले.

देशातील केवळ 7 टक्के कामगार संघटित असून 93 टक्के कामगार असंघटित आहेत. हा विरोधाभास फार मोठा आहे. काही कंपन्यांमध्ये विविध कामगार संघटना अस्तित्वास असलेले चित्र दिसते आहे. परंतु या सर्व कामगार संघटनांनी कामगारांच्या अस्तित्वासाठी आपले झेंडे बाजूला ठेऊन एकत्र आले पाहिजे. या मेळाव्यात कामगारांचे वेतन ठरविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर वेतन आयोग लागू करावा, कामगार राज्य विमा योजना सर्व स्तरातील कामगारांना लागू करावी, असंघटित आणि घरेलू कामगारांसाठी बनविलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, नव्याने येऊ घातलेल्या उद्योगांतील कामगारांना कारखान्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर ‘वॉक टू वर्क’ न्यायाने घरे देण्यात यावी आदी ठराव संमत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.