भाजप नगरसेविका किरण जठार विरोधात खोटा दाखला सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भाजपच्या प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेविका किरण जठार यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर आजोबांचा खोटा शाळा सोडल्याचा दाखला सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजेंद्र आनंदराव वायंदडे (वय 57, रा.स.नं.31, धानोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निलेश जठार (रा. टिंगरेनगर, विद्यानगर) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंकूद महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण जठार यांनी प्रभाग क्रमांक एकमधून महिला अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. या दरम्यान त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, येरवडा येथे त्यांच्या जातीच्या दाखल्याची वैधता पडताळणी करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात प्रकरण सादर केले होते. 

जठार यांनी त्यांचे आजोबा लक्ष्मण गंगाराम कसबे येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील शाळा सोडल्याचा दाखला सादर केला होता. मात्र शाळेत तशी कोठेही नोंद आढळून येत नाही. उलट शाळेने देखील समितीला लक्ष्मण कसबे यांची कोठेही नोंद आढळून येत नसल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे किरण जठार यांचा सदरचा दाखला बनावट असल्याची माहिती समोर आली असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी तो सादर करून फसवणूक केल्याचे समितीला आढळून आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात कलम 464, 465, 471, 468, 420 कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी.व्ही. देशमुख करत आहेत. दरम्यान, माजी नगरसेवक हुलगेश चलवादी व सामाजिक कार्यकर्ते दिलिप ओरपे यांनी जठार यांच्या दाखल्याबाबत जात पडताळणी समितीकडे हरकत घेतली होती. तसेच त्यांनी आजोबांचा बनावट दाखला सादर केल्याप्रकरणी शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आणून जठार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. पुणे महापालिका आयुक्तांनी प्रभाग क्रमांक दोनमधील भाजप-आरपीआयच्या नगरसेविका फरजाना अयुब शेख यांचे नगरसेविका पद गुरुवारी रद्द केले होते. आयुक्त जठार यांच्या पदाबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.