उर्से टोल नाक्यावर मोटारीतून तीन कोटींच्या जुन्या नोटा जप्त, दोन बिल्डरसह तिघे ताब्यात

एमपीसी न्यूज – तब्बल दोन कोटी ९० लाखाच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्‍या दोन बांधकाम व्यावसायिकासह तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण एटीएस, तळेगाव, लोणावळा पोलिसांनी उर्से टोल नाका येथे ही कारवाई केली.
 
गौरव भगवानदास अगरवाल  (खराळवाडी, पिंपरी), निविंदू घनश्याम गोयल (पिंपळेगुरव) व दिलीप सत्यनारायण गुप्ता अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अटक केलेले तिघेही जुन्या नोटा बदलण्यासाठी मुंबईला गेले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. दरम्यान, मुंबईहून पुण्याला येत असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करून उर्से टोल नाक्यावर गाडी अडवली. गाडीत दोन कोटी 90 लाख रुपये आढळून आले.
 
उपाधीक्षक जी. एस. माडगूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे जुन्या नोटा बदलण्यासाठी हे तिघे गेले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. दरम्यान, याबाबतची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक व अधीक्षकांचे पथक यांना मिळाली. त्यावरून ही माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आली. परंतु, तोपर्यंत मर्सिडीज लोणावळ्यावरून पुढे निघाली होती. म्हणून तेथील पोलिसांनी मर्सिडीस (एमएच 14, सीके 400) चा पाठलाग सुरू केला. तर पुणे एसपी ऑफिसमधील पथक उर्से येथे सापळा रचून थांबले होते. तेथे कार येताच ती ताब्यात घेण्यात आली.
 
लोणावळ्याचे निरीक्षक चंद्रकांत जाधव, एसपी स्कॉडचे सहाय्यक निरीक्षक अर्जुन मोहिते, ग्रामीण एटीएसचे घोगुरकर व पथकाने ही कामगिरी केली. आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली असून, तळेगाव पोलीस ठाण्यात नोटा मोजण्यात आल्या.
""

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.