हडपसर येथे पोलीस ठाण्याच्या आरक्षित जागेत आग लागून जप्त केलेली वाहने जळून खाक

एमपीसी न्यूज – हडपसर – माळवाडी येथे अमरधामच्या समोर पोलीस ठाण्याच्या आरक्षित मोकळ्या जागेत आज (बुधवार) सकाळी पावणेनऊच्या सुमारास अचानक आग लागून जप्त केलेली वाहने जळून खाक झाली. अग्निशामक दलाला कळविल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल होत अवघ्या 20 मिनिटांत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेची अधिक माहिती अशी की, माळवाडी अमरधाम येथील पोलीस ठाण्यासाठीची आरक्षित मोकळी जागा आहे. या जागेवर जप्त करण्यात आलेली तसेच बेवारस वाहने लावली जातात. येथून जवळच लाकडाची वखार आहे. तसेच या जागेत कचरा टाकला जातो व उघड्यावरच नैसर्गिकविधीचा वापर वाढला आहे. आज, सकाळी या ठिकाणी अचानक आग लागली. मोकळी जागा व कचरा असल्यामुळे आग लागण्याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही. अग्निशामक दलाला कळताच जवानांनी तातडीने धाव घेत अवघ्या 20 मिनिटांत आग आटोक्यात आणली. तो पर्यंत या आगीमध्ये 3 ऑटो रिक्षा व चार चारचाकी बेवारस वाहने जळून खाक झाली. अग्नीशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

ही कामगिरी हडपसर अग्निशामक केंद्र प्रमुख शिवाजी चव्हाण, फायरमन टिळेकर, चौरे, पवार, भंडारी, जगताप यांनी बजावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.