भवानी पेठेतील नाल्यावरील पार्किंगची जागा भाडे तत्वावर देण्यास स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या भवानी पेठेतील कासेवाडीलगतच्या नागझरी नाल्यावरील पार्किंगची जागा भाडे तत्वावर तब्बल 5 लाख 60 हजार रुपयांना एका ठेकेदाराला देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मतदानाच्या जोरावर मान्यता देण्यात आली.

भवानी पेठेतील कासेवाडी कॉलनी नं. 10 येथील नाल्यावर स्लॅब टाकून शासनाच्या विशेष निधीतून पार्किंग विकसित करण्यात आले आहे. शासनाने ही जागा मोफत पार्किंगसाठी दिली आहे. मात्र, पालिकेच्या भूमी जिंदगी विभागाने या जागेवर पे अॅण्ड पार्किंगसाठी निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, या पार्किंगच्या ठिकाणी मृत जनावरे जाळण्याचा प्रकल्प नियोजित होता. त्यामुळे या पे अॅण्ड पार्कच्या निविदेस तब्बल तीनवेळा निविदा मागवूनही प्रतिसादच मिळू शकला नव्हता.

दरम्यान, या ठिकाणच्या मृत जनावरे जाळण्याचा प्रकल्प अन्यत्र हलविण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा राबविलेल्या निविदा प्रक्रियेदरम्यान केवळ एकच निविदा आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने संबंधित निविदाधारकाला ठेका देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, संबंधित निविदाधारक स्थानिक भाजप नगरसेविकेचा नातलग आहे, असा आरोप प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेवकाने केला होता, तर संबंधित निविदाधारकाने या जागेसाठीची निविदा प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली आहे. केवळ भाजप नगरसेवकाशी संबंधित संस्थेला हे पार्किंग वापरासाठी मिळत नसल्याने त्याच्याकडून प्रशासनावर दबाव आणला जात आहे, असा आरोप भाजप नगरसेविकेने केला. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात सापडली होती.

अखेर स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निविदेला विरोध केला. त्यामुळे यावर मतदान घेण्यात आले. शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली, तर भाजपने बहुमताच्या जोरावर ही निविदा मंजूर केली. 9 विरुद्ध 4 मतांनी या निविदेला मान्यता देण्यात आली, असे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.