संधी ओळखून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते – किरण गित्ते


नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम वर्ष स्वागत समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज – आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. आलेली संधी ओळखून प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यशाचे शिखर गाठता येते, असे मत पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी व्यक्त केले.

तळेगाव येथील पिंपरी-चिंचवड एजुकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष स्वागत समारंभासाठी किरण गित्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, विश्वस्त रामदास काकडे, सुरेशभाई शहा, केशवराव वाडेकर, नंदकुमार शेलार, यादवेंद्र खळदे, राजेश म्हस्के, मुकुंद खळदे, महेश भाई शहा, डॉ. हरीश तिवारी आदी उपस्थित होते.

वेळेचा अचूक उपयोग, कष्ट करण्याची सवय, अपार जिद्द, महत्वाकांक्षा या गोष्टी मुळेच माझ्यासारखा खेड्यातील  शेतक-याचा मुलगा सनदी अधिकारी झाला. आपण सुद्धा आगामी काळात समस्यांचा बाऊ न करता शिक्षणाच्या आधारे ध्येय प्राप्त करू शकता, असा विश्वास गित्ते यांनी व्यक्त केला.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करून दिली जात असल्याने विद्यार्थ्यांना सहज पणे औद्योगिक स्पर्धेला सामोरे जाता येणार आहे, असे मत रामदास काकडे यांनी केले. प्राध्यापक शीतलकुमार रवंदळे यांनी गुणवत्ता दाखवणा-या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटची जबाबदारी घेतली, तर विभाग प्रमुख प्राध्यापक रामदास बिरादार यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची खात्री दिली. या प्रसंगी विद्यापीठात ग्राफिक्स या विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मोदी यांनी केले. आभार डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शेखर राहणे, प्रा. आनंद दौलताबाद, प्रा. मनोज जुन्नरकर, प्रा. शंकर राव उगळे आदींनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.