पुणे शहराला लवकरच मिळणार आरोग्य प्रमुख


मुख्यमंत्र्यांनी दिले विधानसभेत आश्वासन

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी यांचे पद लवकरच भरण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. तसेच, पालिकेच्या सोनोग्राफी मशिन खरेदीतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.

पुणे शहरातील आमदार विजय काळे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. औषध खरेदी; तसेच सोनोग्राफी मशिनच्या खरेदीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे माजी प्रमुख एस. टी. परदेशी हे  31 मे रोजी सेवानिवृत्त झाले असून गेल्या 2 महिन्यापासून आरोग्य प्रमुख पद रिक्त आहे.

आरोग्य खात्यातील अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे यावर कार्यवाही करण्याची मागणी विजय काळे यांनी केली. त्यावरही खुलासा करताना, आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना पालिकेला करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.