Talegaon : कलाकार म्हणून घडण्यासाठी आत्मपरीक्षण गरजेचे – सुनील बर्वे

कलापिनीचा 41 वा वर्धापनदिन साजरा

एमपीसी न्यूज- कलाकार म्हणून घडण्यासाठी आत्मपरीक्षण करून स्वत:मध्ये आणि अभिनयामध्ये बदल करणे गरजेचे आहे. कारण या क्षेत्रात कोणीही बोट धरून काही शिकवत नाही, असे मत प्रसिद्ध नाट्य – चित्रपट अभिनेते व निर्माते सुनील बर्वे यांनी व्यक्त केले. कलापिनीच्या 41 व्या वर्धापन दिना निमित्त ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर, उपाध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, श्रीशैल गद्रे, अशोक बकरे, हेमंत झेंडे, विनायक भालेराव, डॉ. आनंद वाडदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी कलापिनीच्या कलाकारांचा गौरव बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला.

गेल्या २५ ते ३० वर्षांच्या अभिनय व निर्मिती क्षेत्रातील प्रवासाबद्दल सुनील बर्वे भरभरून व दिलखुलासपणे बोलले. ते म्हणाले, “सहकलाकारांच्या आणि दिग्दर्शकांच्या सहकार्यानेच अभिनेता म्हणून सतत सुधारणा करू शकलो. भूमिका कोणतीही असो, ती मनापासून करणे इतकंच मी शिकलो. जुन्या आणि नवीन कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे टाईप कास्ट मध्ये मी अडकलो नाही. हर्बेरीयम या उपक्रमाचा दस्तऐवज करून ठेवल्याने पुढील पिढ्यांना त्याचा उपयोग होईल“

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. दिनेश कुलकर्णी यांच्या गीताला विनायक लिमये यांनी संगीत दिले होते. विराज सवाई, प्रणव केसकर, वेदांत गिरे व अनुजा झेंड यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर ‘पती गेले ग काठेवाडी’ या नाटकातील नांदी व गण आशुतोष सरदुमे, अक्षय देशपांडे, विराज सवाई, प्रणव केसकर, चेतन पंडित व चैतन्य जोशी यांनी केला. विनायक लिमये, कौस्तुभ ओक व वादिराज लिमये यांनी साथसंगत केली.

विनायक काळे व ह्रितीक पाटील यांनी ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकातील सुनील बर्वे यांनी सादर केलेली नाथा कामत ही भूमिका असलेला प्रवेश सादर केला. आपण केलेल्या भूमिका व नाटके बघून बर्वे यांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. कलापिनीचा अहवाल व सुनील बर्वे यांची ओळख ध्वनी चित्रफितीद्वारे सादर करण्याच्या कल्पनेचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. विनया केसकर यांना मराठी साहित्यात पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. आयुष थेऊरकर, शुभ्रा सुतार, कार्तिकी निमगुलकर, रुद्राक्ष पानसरे (बालभवन सितारा), विद्या मुळे, श्री. जे. संपत, गीता संपत, (हास्ययोग सितारा) पार्थ जोशी (कुमार भवन सितारा), आदित्य धामणकर, सायली रौंधळ (धडपड पुरस्कार ), धनश्री वैद्य, चैतन्य जोशी (आश्वासक पदार्पण ), ह्रितीक पाटील (चतुरस्त्र कलाकार), विशाखा बेके, चेतन पंडित (अष्टपैलू कलाकार) यांना गौरविण्यात आले. विनायक काळे यांना कै. हेमंत तुंगार युवा गौरव पुरस्कार देण्यात आला.

डॉ. अनंत परांजपे, डॉ. विनया केसकर व विशाखा बेके यांनी बर्वे यांची मुलाखत घेतली. माधुरी ढमाले व अंजली सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आनंद वाडदेकर यांनी आभार मानले. प्रथमच या मुलाखतीचे थेट प्रक्षेपण फेसबुक’ लाइव्ह करण्यात आले. डॉ. आनंद वाडदेकर यांनी हा यशस्वी प्रयत्न केला. कलापिनीच्या कलाकारांनी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.