Alandi : शैल फौंडेशनच्या वतीने श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत

एमपीसी न्यूज -कोणताही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू (Alandi)नये या उदात्त हेतूने शैल फौंडेशनच्या वतीने श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना गेल्या चौदा वर्षाहूनही अधिक काळापासून शैक्षणिक मदत करते.
याच अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2023 – 24 च्या इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इयत्ता दहावीच्या 128 विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या फी साठी सत्तर हजार चारशे रुपयांचा धनादेश शैल फौंडेशनचे विश्वस्त दिलीप टिकले व रमेश भावे यांच्या हस्ते संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये दीपक मुंगसे यांनी शैल फौंडेशन संस्थे विषयी माहिती देत दानाचे महत्त्व सांगितले. व शैल फौंडेशन कडून मिळालेल्या मदती बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अजित वडगावकर यांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मदतीचा सदुपयोग करून जीवनात यश संपादन करावे तसेच मोठे झाल्यावर या पद्धतीने इतरांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली व शैल फौंडेशन संस्थेचे आभार व्यक्त केले.
त्यानंतर दिलीप टिकले यांनी माऊलींच्या भूमीत ज्ञानदानाचे काम करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्था व संस्थेच्या पदाधिकारी व  विद्यालयाचे आभार व्यक्त केले. तसेच हे विद्यार्थी आमचे लाभार्थी नसून ते आमच्या शैल फौंडेशनचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. व इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.