Alandi Crime News : आजीच्या अंत्यविधीस न आल्याने मुलाला मारहाण; वडील, चुलते, आतेभावावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आजीच्या अंत्यविधीस न आल्याने वडील, चुलते आणि आते भावाने मुलाला बेदम मारहाण केली. तसेच गाव सोडून निघून जा नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री खेड तालुक्यातील कोयाळी येथे घडली.

दीपक भानुदास आल्हाट (वय 31, रा. चाकण, मूळ रा. कोयाळी) असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. त्यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वडील भानुदास महादू आल्हाट, चुलते कान्हूदास महादू आल्हाट, आतेभाऊ रोहित शांताराम घाडगे (सर्व रा. आल्हाट वस्ती, कोयाळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आजीचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी फिर्यादी गेले नाहीत. या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना आजीच्या अंत्यविधीला का आला नाही, अशी विचारणा करत शिवीगाळ केली. तसेच दूध डेअरी बंद कर आणि तू इथून पुढे कोयाळीत देऊ नको, असे म्हणत आतेभाऊ रोहित याने फिर्यादी यांच्या छातीवर लाथ मारली. चुलते कान्हूदास यांनी लोखंडी गजाने फिर्यादी यांना मारहाण केली. तर वडील भानुदास यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांना जखमी केले. तू निघून जा नाहीतर तुला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.