Bhosari News : ‘सीएमई’ हद्दीतील नाल्यांची तात्काळ सफाई करा; आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरातील ‘सीएमई’ हद्दीतून जाणाऱ्या नाल्यांची तात्काळ सफाई करावी. त्याबाबत आरोग्य विभागाला कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळ्यात भोसरीतील नाल्यांमध्ये पाणी येवून नागरिकांच्या घरामध्ये पाणी जावून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.

तसेच, पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी येवून पुरसदृश्य स्थिती निर्माण होते. अनेक ठिकाणी नाले छोटे झाल्यामुळे तसेच काही ठिकाणी नाल्यांवर काँक्रिट टाकल्यामुळे नाले स्वच्छ करता येत नाहीत. परिणामी, अनेक ठिकाणी नाले तुंबले आहेत.

सध्या शहरात ठिकठिकाणी आरोग्य विभागामार्फत नालेसफाईची कामे सुरू आहेत. मात्र, भोसरी परिसरातून ‘सीएमई’ हद्दीतून गेलेल्या नाल्यांची सफाई केलेली दिसत नाही. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे.

तसेच, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागामार्फत ‘सीएमई’ च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परवानगी घेवून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करुन ‘सीएमई’ हद्दीतील सर्व नाले साफ करुन घेण्याकरिता तातडीने सूचना द्यावी. ज्यामुळे पावासाळ्यात प्रवाहास अडथळा निर्माण होणार नाही. याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

नाल्यांची वस्तुस्थिती काय आहे ?

महापालिका ई-क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे म्हणाले, महापालिकेच्या ई आणि क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले ‘सीएमई’ हद्दीतून जातात. महापालिका ‘सीएमई’ हद्दीबाहेरील नाल्यांची सफाई करते. पण, ‘सीएमई’ हद्दीतील नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर लगतच्या घरांमध्ये पाणी घुसते. याबाबत महापालिका सह शहर अभियंता रामदास तांबे यांच्यासोबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसांपूर्वी सर्व्हेक्षण केले आहे.

‘सीएमई’ च्या संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांच्या हद्दीत येवून नालेसफाई करण्याची परवानगी मागितली आहे. त्यांची परवागनी मिळताच यंत्र सामुग्री घेवून महापालिका प्रशासन नालेसफाईच्या कामाला सुरूवात करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.