Bhosari : पोलीस कर्मचारी महिलेवर चाकूहल्ला

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्यावर भांडणे करणा-यांना अडविण्यासाठी गेलेल्या कर्मचारी पोलीस महिलेवर एका महिलेने चाकूहल्ला केला. तर दुस-या महिलेने मारहाण केली. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी एकच्या सुमारास कासारवाडी येथे शंकर मंदिरासमोर पुणे-मुंबई रस्त्यावर घडली.

महिला पोलीस शिपाई एस बी मांदळे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉलर अरविंद नलावडे (वय 45, रा. एम ई एस कॉलनी), रीना डॅनियल जोन्स (वय 40, रा. कासारवाडी) यांच्या विरोधात मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे शंकर मंदिरासमोर पुणे-मुंबई महामार्गावर सर्व्हिस रोडला भांडण सुरु असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाजण एकमेकांशी भांडण करत होते. पोलिसांनी हे भांडण सोडवून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेत असताना रीना जोन्स खाली पडली. तिला महिला पोलीस शिपाई मांदळे उठवत असताना डॉलर नलावडे या महिलेने मांदळे यांच्या पाठीत मारले. त्यानंतर रीना हिने मांदळे यांच्यावर घरातील चाकूने हल्ला केला. यात मांदळे यांच्या हातावर, पोटावर, पाठीवर, मानेवर मार लागला. यावरून मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई सुरेश दत्तात्रय तांबेकर (वय 46) यांनी देखील फिर्याद दिली. त्यानुसार या घटनेतील सहा जणांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉलर अरविंद नलावडे (वय 45, रा. एम ई एस कॉलनी), रीना डॅनियल जोन्स (वय 40, रा. कासारवाडी), डॅनियल मारियो जोन्स (वय 43), पूनम अरविंद लोखंडे (वय 26), संदीप दिनकर लोखंडे (वय 47), भूषण नारायण गुंजाळ (वय 26) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.