Nigdi : रुग्णालय, दुकान आणि घरात चोरी; लॅपटॉप, मोबाईलसह रोकड लंपास

एमपीसी न्यूज – निगडी, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात चार घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालय, दुकान आणि घरात चोरी झाली असून लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम चोरून नेत चोरट्यांनी एका दुकानातील 89 सीसीटीव्ही कॅमेरे फोडले.

निगडी पोलीस ठाण्यात ओमकार नारायणराव खोरगडे (वय 18) यांनी फिर्याद दिली. शनिवारी (दि. 27) पहाटे खोरगडे यांच्या खोलीत चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला. खोलीतून 36 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन आणि आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक एटीएम कार्ड चोरून नेले.

निगडी प्राधिकरण येथील निरंजन नर्सिंग होम या रुग्णालयातून चोरट्यांनी पर्स पळवली. याप्रकरणी गिरीजाबाई मानसिंग शिंदे (वय 55, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली. गिरीजाबाई निरंजन नर्सिंग होम या रुग्णालयात नोकरी करतात. रविवारी रात्री त्या कामावर गेल्या. रुग्णालयाच्या किचनमध्ये एका खुर्चीवर त्यांनी त्यांची पर्स ठेवली. अज्ञात चोरट्यांनी पर्स चोरून नेली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 53 हजार रुपयांचा ऐवज होता.

ताथवडे चौकात ब्रह्मा गेनबा सूर्यवंशी (वय 41) यांचे इलेक्ट्रिकल्स वस्तूंच्या विक्रीचे दुकान आहे. रविवारी (दि. 28) पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून तांब्याची वायर, इंटरनेट वायरचे बंडल, एक लॅपटॉप चोरून नेला. तसेच दुकानातील 89 सीसीटीव्ही कॅमेरे तोडून त्यांचे नुकसान केले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्तीनगरी येथे सोमेश्वर सुधाकर माने (वय 29) यांच्या घरातून दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.