Government office Bribe: शासकीय कार्यालयांतील लाचखोरी थांबणार का?

एमपीसी न्युज : चाकण लगतच्या एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला नुकताच लाच घेताना रंगेहाथ पकडला, त्यामुळे ज्येष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कारकुनापर्यंत ग्रामीण भागात लाचखोरीचा ‘भस्म्या रोग’ जडलेल्या सरकारी नोकरांची प्रशासनातली संख्या सतत वाढत असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे.

खेड तालुक्यात असे अनेक जण पहावयास मिळत आहेत .या भागातील औद्योगीकरण, प्रस्तावित महामार्ग, लोहमार्ग ,शासनाचे विकास प्रकल्प येत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची स्थानिक नागरिकांची भावना आहे.

महसूल विभागासह वेगवेगळ्या प्रशासनातील अनेक मंडळी या भागात येण्यासाठी ,स्वत:ला खेड तालुक्यातील ठराविक भागातील ठराविक पोस्टिंग हवी म्हणून काहीही करायला तयार असतात. याभागात नेमणूक झाल्यानंतर जोरदार वसुली मोहीम राबवितात. मागील काही वर्षांच्या काळात या भागात कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक , फौजदार , पोलीस कर्मचारी, प्रांताधिकारी , तहसीलदार, ते भुमिअभिलेखचे भुकरमापक अशा काही मंडळींचे बुरखे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडून टराटरा फाडले आहेत. कारवाई झालेले आणि या सापळ्यात अडकलेले हे वरिष्ठ अधिकारी म्हणजे अगदी हिमनगाचे टोक असून या पेक्षा कित्येक पट भ्रष्टाचार सुरु असल्याचा सर्वसामान्य नागरिकांचा आरोप आहे.

Lok Adalat: लोक अदालतीने मिटवला तब्बल 50 वर्षे जुना वाद

सगळ्याच अधिकाऱ्यांच्या बाबत असे सापळे लावणे शक्य नसते,काहींचे लागेबांधे वरपर्यंत असतात. उगाच अशा अधिकाऱ्यांच्या नादाला लागून आपल्या कामाचा खोळंबा नको म्हणून कित्येक सामान्य नागरिक अगदी अनिच्छेने या भ्रष्टाचारा समोर माना तुकवितात. प्रशासनातील अनेकांनी राजकारणी आणि भूमाफियांच्या मदतीने सध्या गोरगरिबांच्या जमिनींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी ताबा घेणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. एकूणच यातून अगदी बेमालूमपणे मोठी उलाढाल होत आहे.

अशा प्रकारांमध्ये सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याच्या शेकडो तक्रारी समोर येत आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे सर्रास दाखल करण्यात येत आहेत. बडे राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यापुढे सामान्य नागरिकांचा टिकाव लागत नाही. सामान्य नागरिकांना निमुटपणे अन्याय सहन करण्याशिवाय पर्याय राहत नसल्याची कैफियत नागरिकांकडून मांडण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.