Chikali News : ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’तून नागरिकांचे प्रश्न सोडविणार – यश साने

एमपीसीन्यूज : महापालिका चिखली प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक कै. दत्ताकाका साने यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा आज, मंगळवारी साने चौक येथे प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवून या उपक्रमास प्रतिसाद दिला. या उपक्रमातून नागरिकांचे प्रश्न सोडविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते यश दत्ता साने यांनी दिली.

चिखली प्रभागाचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे चिरंजीव यश साने हे चालवीत आहेत. गेली अनेक वर्ष दत्ता साने यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले. जनतेच्या हाकेला जाऊन त्यांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दत्ता साने कायम तत्पर  असायचे. त्यांच्या निधनानंतर ‘आमच्या तक्रारी, प्रश्न आता कोणापुढे मांडायचे, कोण आम्हाला न्याय मिळवून देणार’, असा प्रश्न प्रभागातील नागरिकांना पडला होता.

या बाबत अनेक नागरिकांनी दत्ता काका यांचे चिरंजीव यश साने यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. त्यावर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी यश साने यांच्या पुढाकाराने ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला.

या उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महापालिका, रेशनींग, महावितरण, अशा अनेक संस्थांशी संबंधित तक्रारी नागरिकांकडून साने यांच्या कार्यालयात नोंदविण्यात येत आहेत. त्यासाठी कार्यालयात एक रजिस्टर ठेवण्यात आले आहे. यामध्ये नागरिक आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि आपली समस्या, प्रश्न, तक्रारी नोंदवित आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरिकांना न्याय मिळवून देणे त्यांच्या अडीअडचणी सोडविणे हेच आपले ध्येय असल्याचे यश साने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.