Chinchwad : ट्रक चालकाला फिल्मी स्टंट करणे पडले महागात; अपघातात स्वतःच्या चुकीने गमावला पाय


एमपीसी न्यूज – सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाला आपला पाय गमवावा लागला. चालकाने केलेला स्टंटच त्याच्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. बुधवारी (दि. 20) सकाळी चिचंवड गाव येथे हा अपघात झाला होता.

रेवान्ना अश्रुबा कोपनर (वय 35 रा. चोपडेवाडी, बीड) असे चालकाचे नाव असून त्याच्यावर पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल चौकातून रेवान्ना ट्रक घेऊन जात असताना त्याने सिग्नल तोडला. यावेळी महिला वाहतूक पोलीस कर्मच्या-याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थांबला नाही. त्याने तसाच ट्रक पुढे दामटला. वाहतूक पोलीस कर्मच्या-यांनी त्याचा पाठलाग केला व त्याला आडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यांना हुलकावणी देऊ लागला. पुढे जाऊन त्याने रस्त्यातच ट्रक थांबवून खाली उतरला. रेवन्नाने चालण्यास सुरुवात केली मात्र ट्रकला हॅन्डब्रेक न लावल्यामुळे ट्रक आपोआप सुरु होऊन पुढे जाऊ लागला. त्यावेळी त्याने घाबरुन जाऊन चालत्या ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ट्रक दुभाजकाला जाऊन धडकला व त्यातच त्याचा डावा पाय निकामी झाला.

चिंचवड विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक संजीव पाटील एमपीसी न्यूजशी बोलताना म्हणाले की, या सा-या प्रकरात रस्त्यावरील वाहनाला अपघात होणे किंवा आमच्या कर्मच्य-याला दुखापत होणे किंवा चालकाच्याही जिवीताला धोका होता. मात्र केवळ दंड भरण्याच्या भीतीपोटी त्याने हा स्टंट केला पण तो जिवघेणा स्टंट होता. तो जखमी झाल्यानंतर आमच्याच कर्मच्या-यांनी त्याला रुग्णवाहीकेतून रुग्णालयात दाखल केले.

मात्र मुळातच नागरिकांनी नियम मोडू नयेत व मोडले तरी प्रमाणिकपणे दंड भरावा जेणे करुन त्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागणार नाही, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.