Pimpri : रतनगड-हरिश्चंद्रगडावर शिवसंकल्प युवक शिबिर उत्साहात संपन्न


एमपीसी न्यूज – शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भंडारदरा जलाशय व कळसुबाई अभयारण्याच्या कुशित वसलेल्या रतनगड व हरिश्चंद्रगड या यादवकालीन वनदुर्गावर शिव विचार जागर अभियान व शिवशाही संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शिवसंकल्प युवक शिबिराचे आयोजन करण्यात आले. 17 ते 19 डिसेंबर दरम्यान झालेल्या शिवसंकल्प युवक शिबीर रतनगड व हरिशचंद्रगड येथे संपन्न झाले.

शिबिराचे यंदा अकरावे वर्ष असून नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवीच्या आजी-माजी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात या शिबिराचे दरवर्षी नियोजन करण्यात येते. शिबिराबद्दल सांगताना शिबिराचे मुख्य आयोजक प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ म्हणाले की, वर्तमानकाळ हा भारतीय संस्कृत्ती संक्रमणाचा बिकटकाळ आहे. अकराव्या शतकामध्ये सुलतानी आक्रमणापासून महाराष्ट्र धर्म व संस्कृती वाचविण्यासाठी संतांनी चांगल्या विचारांचे भक्कम व्यासपीठ उभे केले. त्याप्रमाणे आज अशा भक्कम व्यासपीठाची गरज निर्माण झाली आहे. आजची तरुणाई पाश्चात्य भोगवादी संस्कृतीला बळी पडून व्यसनाधीनतेकडे झुकली आहे.

शिवछत्रपतींना आदर्श मानणा-या या पिढीला शिवाजी महाराजांच्या स्वच्छ, निर्व्यसनी आणि प्रेरक विचारांची गरज आहे. तरुणांमधील सुप्त शक्तीला विधायक कार्याकडे वळवले पाहिजे. त्यासाठी अशा शिबिरांचा उपयोग होईल. या शिबिरात सहभागी विद्यार्थी एका गडावरून दुस-या गडावर पदभ्रमण करत जातात.

शिबिराच्या पहिल्या सत्राचा प्रारंभ रतनगडाच्या पायथ्याला असलेल्या बाराशे वर्षांपूर्वीच्या यादवकालीन अमृतेश्वर मंदिरात झाला. यावेळी हभप मधुसूदन पाटील महाराज यांनी ‘भय इथे संपत नाही’ या विषयावर मार्गदर्शन केले. पाटील महाराज म्हणाले की, भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो भीतीवर विजय मिळवतो, त्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो.

दुस-या दिवशीची सुरुवात रतनगडावर सूर्यनमस्काराने झाली. यावेळी शिवव्याख्याते राहुल शिंदे यांनी ‘शिवकालीन दुर्गरचना’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिंदे म्हणाले, ‘शिवरायांचा स्थापत्य कलेतील चमत्कार म्हणजे त्यांची गोमुखी पद्धतीची दुर्ग-द्वार रचना होय. या रचनाशीलतेला विश्वात तोड नाही’. व्याख्यानानंतर शिबिरार्थींनी गडाला सलामी देऊन कात्राईची खिंड ओलांडून हरिश्चंद्रगडाकडे प्रस्थान केले.

तिस-या दिवसाचा प्रारंभ शिवपरिपाठाने करण्यात आला. हरिश्चंद्रेश्वराच्या साक्षीने सर्व शिबिरार्थींना रायगडाची पवित्र माती देऊन शुध्द चारित्र्याची व व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली. यावेळी ऑयासिस कौन्सीलरचे सर्वेसर्वा संमोहनतन्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी मेडिटेशनद्वारे मुलांना आत्मसंकल्प करण्याकरिता प्रेरीत केले. शिवशाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमित थोपटे यांनी प्रस्ताविक केले.

समारोप समारंभाचे सूत्रसंचालन युवा शिवव्याख्याते ऋषिकेश शेलार यांनी केले. आभार मुकेश चव्हाण यांनी मानले. किशोर घोडके, सुनिल कोटकर, फौजी सुमित कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज शेलार, किशोर एकबोटे, विश्वजित पाटील, गणेश आडागळे, माधव मोरे, अमोल टेंभरे, वैशन्व शेळके, वैभव जुनवणे यांनी परीश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.