Nigdi : सायकल घेऊन दिली नाही म्हणून बारा वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून रागावलेल्या 12 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (दि. 7) रात्री निगडी जवळ अप्पूघर परिसरात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

इशांत बलबीर शर्मा (वय 12, रा. सिद्धिविनायक नगरी, अप्पूघर, निगडी प्राधिकरण), असे आत्महत्या केलेल्या लहान मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी इशांतने त्याच्या वडिलांकडे सायकल घेऊन देण्याची मागणी केली. बलबीर यांनी त्याला त्याची मनपसंद सायकल घेऊन देण्याचे अश्वासन दिले. त्यानंतर बलबीर आपल्या कामात व्यस्त होते. त्यांना कामाच्या व्यस्ततेमुळे इशांतला सायकल घेऊन द्यायला जमले नाही. शनिवारी इशांतने रागाच्या भरात पुन्हा सायकलची मागणी केली आणि आपल्या खोलीत गेला. इशांत रागावला असेल आणि त्याचा राग थोड्या वेळात कमी होईल, असे समजून घरच्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. बराच वेळ झाला तरी इशांत बाहेर आला नाही. म्हणून घरच्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने काही वेळेनंतर घरच्यांनी दरवाजा तोडला असता इशांतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.