Chinchwad : आगामी सण उत्सवात ‘सिम्बा’ आणि ‘जेम्स’वर मोठी जबाबदारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात नुकताच (Chinchwad) ‘सिम्बा’ आणि ‘जेम्स’ या दोन नवीन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा (Paw Officers) समावेश झाला आहे. आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आठ आणि पाच वर्ष वय असलेल्या या दोन अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात श्वान पथक आणि बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) स्थापन करण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तांकडून गृहमंत्रालय आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पोलीस महासंचालकांनी पुणे शहर पोलीस दलातील दोन श्वान पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांना देण्याबाबत सीआयडीला आदेश दिले. त्यानुसार सीआयडीने सिम्बा आणि जेम्स या दोघांना पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे पाठवले आहे.

सिम्बाचे वय आठ वर्ष आहे. त्याचे प्रशिक्षण राजस्थान येथे झाले आहे. तर जेम्सचे वय पाच वर्ष असून त्याचे प्रशिक्षण हरियाणा येथे झाले आहे. श्वानांचा पोलीस दलात गुन्हे शोधक, अंमली पदार्थ शोधक आणि बॉम्बशोधक या तीन प्रकारे वापर केला जातो. खून, दरोडा, घरफोडी, हरवलेली आणि अपहरण झालेली व्यक्ती शोधण्यासाठी श्वानांची मदत होते.

कोकेन, गांजा, अफू आणि इतर अंमली पदार्थ शोधण्यासाठी देखील श्वानांचा वापर होतो. गर्दीच्या ठिकाणी, अति महत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांमध्ये, जमिनीत पुरलेली स्फोटके शोधण्यासाठीही श्वान उपयोगी पडतात. सिम्बा हा गुन्हे शोधक म्हणून काम पाहणार आहे. तर जेम्स स्फोटके शोधण्याचे काम करणार आहे.

आगामी काळात मोठी जबाबदारी (Chinchwad)

गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणांची तसेच संशयित ठिकाणांची श्वान व बॉम्ब शोधक नाशक पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील गर्दीची ठिकाणे आणि संशयित ठिकाणांची तपासणी करण्याची जबाबदारी सिम्बा आणि जेम्स यांच्यावर असणार आहे.

असे झाले स्वागत

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नुकतीच श्वान पथकाची स्थापना केली आहे. या पथकात सिम्बा आणि जेम्स या दोन श्वानांची पुणे येथून बदली झाली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात श्वान पथकाचे कार्यालय आहे. बुधवारी (दि. 13) सायंकाळी सिम्बा आणि जेम्स यांना पिंपरी-चिंचवड येथे आणण्यात आले. फुग्यांची सजावट, रांगोळी आणि मखमली फुलांची चादर अंथरून या दोघांचे शहर पोलीस दलात स्वागत करण्यात आले.

Hinjawadi : कस्टममध्ये पार्सल अडकले आहे सांगत महिलेची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक

टीम के 9 मध्ये होते कार्यरत

अमेरिकेत श्वानांना प्रशिक्षण देणारी जगविख्यात ‘के 9’ ही संस्था आहे. या संस्थेत श्वानांना 181 प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेच्या नावावरून पुणे शहर पोलीस दलातील श्वान पथकाला ‘के 9’ असे नाव देण्यात आले होते. श्वानांच्या जबड्यातील दोन दातांच्या सुळ्यांना के 9 असे म्हटले जाते. पुणे शहरातील के 9 टीममध्ये जेम्स, सिम्बा, प्रिन्स, बदल, विरू, रुद्र, लिओ, रॅम्बो, जॅक हे नऊ श्वान होते. त्यातील जेम्स आणि सिम्बाची पिंपरी-चिंचवड शार्हात बदली झाली आहे.

पोलीस दलातील एन्ट्री

राज्यात सुमारे 385 ते 400 श्वान पोलीस दलात कार्यरत आहेत. लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड, डॉबर मॅन, बेल्जियम शेफर्ड या श्वानांचा पोलीस दलात सहभाग असतो. यातील बेल्जियम शेफर्ड हे श्वान सर्वात महाग आणि चपळ समजले जाते. पोलीस दलात एखाद्या श्वानाला समाविष्ट करून घेण्यासाठी जन्मानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्याचे असतानाच त्याला घेतले जाते.

श्वानाचे आयुर्मान सुमारे 14 वर्ष असते. ते पोलीस दलात दहा वर्ष सेवा बजावतात. त्यानंतर ते निवृत्त होतात. फिटनेसच्या करणामुळे त्यांना कधीही निवृत्त केले जाते. त्यानंतर त्यांचे राजस्थान आणि हरियाणा येथे नऊ महिने प्रशिक्षण होते.

एका श्वानासाठी दोन हँडलर

श्वान पथकात दाखल होणा-या प्रत्येक श्वानासाठी दोन हँडलर असतात. जो हँडलर त्यांना प्रशिक्षण देतो, तोच त्या श्वानाच्या सोबत कायम राहतो. प्रत्येक हॅँडलर त्याची 12-12 तास काळजी घेतात. त्यांचे डाएट, व्यायाम, प्रशिक्षण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी हे हॅँडलर घेतात. हे श्वान केवळ आपल्या हॅँडलरचेच ऐकतात. त्यामुळे हे श्वान जिथे जातात तिथे त्यांचे हॅँडलर सावलीप्रमाणे सोबत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.