Karjat : देश सुरक्षित हातात राहायला पाहिजे – श्रीरंग बारणे

कर्जत तालुक्यात खासदार बारणे यांची प्रचार फेरी

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा सक्षम सरकार आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार जिंकणं महत्त्वाचं आहे. मतदारांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. या उत्साहातून शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीची ताकद वाढत आहे. यामुळे आपला भारत देश पुन्हा एकदा सुरक्षित हातात राहणार आहे, असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

कर्जत तालुक्यात खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि. 27) प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीची सांगता कर्जत येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. प्रचार फेरीमध्ये आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, सुनील गोगटे, नगरसेवक विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे, बैजू घुमरे, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, शहरप्रमुख भालचंद्र जोशी, दीपक बेरे, माजी सभापती अमर मिसाळ, राजेश जाधव, तालुका प्रमुख संभाजी जगताप, संतोष भोईर, वसंत भोईर, राहुल डालीमकर, सुरेश बोराडे, ज्ञानेश्वर भालीवडे, ऐत्यशाम पेनवाला, उमेश सावंत, सुनील गोगटे, सुनील ठाकूर, दत्ता साबणे, संभाजी जगताप, रामचंद्र भोवळ, तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्जत तालुक्यातील वेणगाव, वदप, गौरकामथ, सावेले, तांबस, कडाव, तांदोली, चिंचवली, नेरळ, भिवपुरी, कर्जत इत्यादी ठिकाणी जाऊन खासदार बारणे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी विविध सेल, आघाड्या आणि शाखांकडून खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला.

कडाव येथे शिवशक्ती क्रीडा मैदानाचे, नेरळ मधील हुतात्मा हिराजी पाटील चौक फलकाचे अनावरण खासदार बारणे यांच्या हस्ते उदघाटन झाले. नेरळ येथे झालेल्या प्रचार रॅलीत शेकडो शिवसैनिकांनी हजेरी लावली. दरम्यान ‘कोण आला रे कोण आला, महायुतीचा वाघ आला’, ‘श्रीरंग बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, महायुतीचा, विजय असो’ या घोषणांनी परिसर दुमदुमला.

खासदार बारणे म्हणाले, “देशाच्या लोकसभेत मावळ लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न प्राथमिकतेने मांडले. मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक निधी कर्जत तालुक्याला दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवून तसेच लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारून मावळच्या जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ केला. कोंढाणा धरणाचा कोट्यवधींचा घोटाळा करणा-या राष्ट्रवादी पक्षाला एकही स्थानिक उमेदवार सापडला नाही. यातूनच त्यांची लोकप्रियता समाजते. त्यामुळे विजय हा निश्चितपणाने महायुतीचाच होणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.