Pimpri : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी डॉ. के अनिल रॉय यांचे ‘फेसबुक पेज’ ठरतंय प्रभावी
एमपीसी न्यूज – शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘फेसबुक’ पेजचा योग्य वापर केला आहे. आरोग्य विभागाने ‘पीसीएमसी हेल्थ अॅन्ड सॅनिटेशन सोल्यूशन’ या नावाने फेसबुक पेज सुरु केले असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिक आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबतच्या तक्रारी या फेसबूक पेजवर करतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्याची तातडीने दखल घेत परिसर स्वच्छ केला जात आहे. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यात ‘फेसबुक’ची मोठी मदत होत आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या संकल्पनेतून फेसबुक पेज सुरु करण्यात आले आहे.
पिंपरीतील, मोरवाडी चौकात बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री होत असल्याबाबत गणेश बोरा यांनी ‘पीसीएमसी हेल्थ अॅन्ड सॅनिटेशन सोल्यूशन’ पेजवर तक्रार केली होती. त्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेत त्यावर कारवाई केली. याबाबत बोरा सांगतात, या पेजवर तक्रार केल्यानंतर तातडीने मोरवाडीतील प्लॅस्टिक विक्री करणा-यांवर कारवाई केली. याशिवाय शहरातील सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक विक्री करणा-यांवर कारवाई केली. याशिवाय कचरा जाळला जात असल्याबाबतचे फोटो पेजवर टाकले होते. त्यावर देखील कारवाई केली.
पेजला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय पेजवर टाकलेली तक्रार संपूर्ण शहरभर त्यावर आरोग्य विभागाकडून काम केले जाते. पेजवरील तक्रारीची आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय तत्काळ त्याची दखल घेतात. या पेजचा शहराच्या आरोग्याची सुधारण्या होण्यासाठी चांगली मदत होत आहे. पर्यावरणवर काम करणारे लोक ज्या गोष्टीवर बोलतात त्याची दखल घेतली जाते, असेही बोरा यांनी सांगितले.
औषध फवारणी करण्याबाबत प्रवीण अहिर यांनी फेसबुक पेजवर सूचना केल्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी आरोग्य विभागाने औषध फवारणी केली. त्याचे फोटो फेजवर अपलोड केले. काम झाल्याचे फोन करुन सांगितले. तत्काळ सेवा मिळाल्याने समाधान झाल्याचे अहिर सांगतात. डॉ. अनिल रॉय ऑफिसच्या चौकटीच्या बाहेर पडून नागरिकांच्या समस्यासाठी सोशलमिडीयाचा प्लॅटफॉर्म वापरतात, ही मोठी गोष्ट आहे. त्यांचे कौतुक आहे. दुस-या तक्रारीबाबत देखील डॉ. रॉय सल्ला देतात. शहर स्वच्छ राहिल्यावर चांगले वाटते. सोशलमिडीयाचा वापर केल्यापासून स्वच्छतेबाबत बदल दिसत आहेत.
“मला महापालिकेत जायची गरज नाही. तक्रार केली की त्याचे निराकारण होते. त्यामुळे करदाता नागरिक म्हणून मी समाधानी असल्याचे प्रवीण अहिर सांगतात. कर भरल्यानंतर जे अपेक्षित आहे, त्या सुविधा मला मिळत आहेत” पाणीपुरवठा विभागाने देखील याचे अनुकरण करावे, अशी अपेक्षाही अहिर यांनी केली.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ” काल एका नागरिकाने पिंपळेनिलख परिसरात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याबाबतची तक्रार पेजवर केली. त्यानंतर आरोग्य विभागाने आज तातडीने छापा मारत कारवाई केली. 20 हजार रुपये दंड वसूल केला. यामुळे महापालिकेचे आणि आरोग्य विभागाचे देखील काम सोपे होते”
या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. आपल्या परिसरातील समस्या सांगतात. आम्ही तातडीने त्याचे निराकरण करतो. त्यामुळे नागरिकांना त्याचे काम झाल्याचे समाधन होते. ज्या कर्मचा-यांने काम केले आहे. त्यांचे नाव आणि फोटो देखील या पेजवर अपलोड केले जाते. त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळते. अनेकजण लाईक, कॉमेंट करतात. चांगले, वाईट अनुभव येतात. त्यातून आम्हाला कामात सुधारणा करता येते, असेही डॉ. रॉय सांगतात.