Dehugaon : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी प्रस्थान

एमपीसी न्यूज – जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 333 व्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासन देखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोहळा प्रस्थानाच्या कार्यक्रमाला गुरूवारी पहाटे नैमितिक महापूजेने सुरूवात होणार आहे. पहाटे 5 वाजता श्रींची महापूजा व शिळामंदिरातील महापूजा पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्थांच्या हस्ते होईल. 

श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन मंदिरात पहाचे 6 वाजता महापूजा होईल. सकाळी 7वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधीची महापूजा होणार आहे. सकाळी 10 ते 12 संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काल्याचे किर्तन होणार आहे. सकाळी 9 ते 11 वाजण्याच्या सुमारास श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांची इनामदार वाड्यात महापूजा होईल. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघेल व 6.30 वाजण्याच्या सुमारास पालखी इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामी दाखल होईल. तेथे अभंग आरती होणार आहे. 

पालखी प्रस्थानापूर्वी करावी लागणारी सर्व नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने पूर्ण करण्यात आली असून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका सेवेकरी घोडेकर सराफ यांच्याकडे चकाकी देण्यासाठी देण्यात आल्या आहेत. उद्या या पादुका मानकरी मसलेकर हे पादुका घोडकर सराफांच्या घरून घेऊन इनामदार वाड्यात येतील. तेथे त्यांची दिलीप महाराज मोरे इनामदार यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात येईल. याच पादुका मुख्य मंदिरात प्रस्थानापूर्वी पूजेसाठी आणल्या जातील. मुख्य मंदिरातील भजनी मंडपात विविध मान्यवरांच्या व शासकीय अधिकारी उपस्थित राहतील. 

मंदिर परिसरातील, सर्व स्वच्छता झाली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गटारांची साफ सफाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणचे कचऱ्याचे ढीग उचण्याचे काम सुरू होते. यासाठी ग्रामपंचायतीच्या 25 कामगारांसह रोजंदारी वर काही कामगारांची तात्पूरती नेमणूक करून ठिकठिकाणचा कचरा उचलण्याचे काम करण्यात आले आहे. कचरा उचलल्यावर त्या जागेवर डीडीटी फवारणी केली आहे. परिसरामध्ये डासांचा त्रास होऊ नये म्हणून धूर फवारणी देखील सुरू आहे. मात्र, पावसामुळे या कामात अडथळा येत होता. भाविकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मेडिक्लोरचे वाटपही करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक अर्जुन गुडसूरकर, सरपंच उषा चव्हाण यांनी दिली. 

दरम्यान, दिंड्यांना उद्या सकाळपासूनच प्रदक्षिणेसाठी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार असून उत्तर दरवाजाने त्यांना बाहेर पडावे लागणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ पास धारकांनाच भजनी मंडपात प्रवेश देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.