Pune : सिंहगड घाटात दरड कोसळली; गडावर जाणारी वाहतूक बंद

एमपीसी न्यूज – सिंहगड घाटात आज रविवारी (दि. 8) पहाटे दरड कोसळली. यामुळे गडावर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने गडावर पर्यटक नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. 

सिंहगड, खडकवासला हे पुण्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ असल्याने शनिवार रविवार सुटीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. मात्र, या रविवारी पर्यटकांची निराशा झाली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आज दिवसभर सिंहगडावर जाणारी वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 

गेल्या वर्षीही 31 जुलै रोजी सिंहगड घाटात दरड कोसळली होती. त्यावेळी सायंकाळ असल्याने तब्बल तीन तास पर्यटक गडावर अडकून पडले होते. विशेष म्हणजे आजही मागील वर्षी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती तेथून जवळच्याच अंतरावर ही दरड कोसळली आहे. मात्र, पहाटेची वेळ असल्याने पर्यटक बचावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.