Pune : माऊलींच्या पालखीवर दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी

जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे देखील पुष्पवृष्टीने स्वागत 

एमपीसी न्यूज – माऊली…माऊलीच्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारक-यांसोबत आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी रथांवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माऊली…माऊली, तुकोबा…तुकोबांच्या जयघोषासोबतच गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी गणरायाचरणी नतमस्तक होत आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी साकडे घातले. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जगद्गुरु तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, माणिक चव्हाण, महेश सुर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह ट्रस्टचे विश्वस्त व वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती. 

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. यंदा ट्रस्टच्या गणेशोत्सवाच्या १२६ व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात झाली असून हरित वारी, स्वच्छता आणि वारक-यांकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ट्रस्टच्या जय गणेश हरित वारी या वृक्षारोपण कार्यक्रमात वारक-यांनी सहभाग घेत वृक्षलागवड व संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.