Pune : माउली माउलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शहरात दाखल

एमपीसी न्यूज – विठ्ठल नामाच्या जयघोषात संत तुकारामांच्या पालखीच्या आगमनानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनेही आज सायंकाळी सातच्या सुमारास पुण्यात आगमन झाले. यावेळी वारक-यांच्या चेह-यावर विठ्ठल भक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. तर संपूर्ण संचेती चौक माउली माउलीच्या गजरात दुमदूमन निघाला होता. 

तुकोबांच्या पालखीने आज पहाटे आकुर्डी येथून प्रस्थान ठेवले. त्यानंतर दापोडी येथे विश्रांती घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्यात दाखल झाली. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीने काल आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. त्यानंतर काल आळंदी येथे गांधीवाड्यात मुक्काम केल्यानंतर आज पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी भक्त पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. त्यानंतर दुपारी विश्रांतवाडी येथे विश्रांती घेऊन आज सायंकाळी पालखी पुण्यात पोहोचली.  विठ्ठलाची ओढ लागलेल्या पुणेकर भक्तांचेही दोन्ही पालखीच्या आगमनाकडे डोळे लागले होते. त्यासाठी पुणे महापालिका विविध संस्था आणि विठ्ठल भक्तांनी संचेती चौकात प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला आहे. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास तुकोबांच्या पालखीचे आगमन झाले. त्यापाठोपाठ माउली माउलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचेही सायंकाळी सातच्या सुमारास आगमन झाले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण पुणे शहर भक्ती रसात न्हाऊन निघाले. विठ्ठलाच्या नामघोषाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला आहे. नागरिकांनी पालखीच्या दर्सनासाठी एकत गर्दी केली होती. 

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराजांची पालखी भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तर ज्ञानोबा महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात सोमवारी सकाळी सहावाजेपर्यंत मुक्कामी थांबणार आहेत. याकालावधीत भजन किर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.