Pimpri : ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबवा; आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान देशभर राबविले जात आहे. पिंपरी (Pimpri) चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेऊन हे अभियान उत्साही स्वरूपात नियोजनबद्ध पद्धतीने राबवा, असे  निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

Nitin Desai : नितीन देसाईंवर होतं तब्बल २५० कोटींचं कर्ज

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ (मिट्टी को नमन, वीरों को वंदन) हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने आज  महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमाचे महानगरपालिका समन्वयक तथा उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, स्मार्ट सिटीचे सह मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी किरणराज यादव, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, किरणकुमार मोरे, उमेश ढाकणे, शितल वाकडे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, सहाय्यक उद्यान अधिक्षक मंजुषा हिंगे आदी उपस्थित होते.

प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरिता मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत शहरातील संस्मरणीय अशा एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करणे, महानगरपालिका हद्दीतील प्रभागनिहाय एक किंवा दोन मूठ माती घेऊन त्यातून शहराचा कलश तयार करून तो सन्मानपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविणे असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.

महापालिका स्तरावर १६ ते २० ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. नागरिकांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांद्वारे आवाहन आणि जागृती करण्यात येणार आहे. मेरी मिट्टी मेरा देश या अभियानामध्ये प्रमुख पाच उपक्रमांचा समावेश असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांना त्यांच्या अखत्यारितील कामकाजाबाबत सूचना अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी यावेळी दिले.

या अभियानामध्ये विविध ५ उपक्रमांचा समावेश आहे. त्यामध्ये शहरातील संस्मरणीय अशा एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार असून त्यावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव, दिनांक, देशाचे पंतप्रधान यांचा संदेश, स्थानिक शहीद वीरांची नावे, ‘मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता प्राणांची आहुती दिलेल्या शुरवीरांना विनम्र अभिवादन’ असे वाक्य देखील शिलाफलकावर नमूद करण्यात येणार आहे.

तसेच देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून शहरातील योग्य जागा निश्चित करून ‘‘वसुधा वंदन’’ म्हणून विविध देशी प्रजातींच्या ७५ रोपट्यांची लागवड करून अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी बलिदान केले अशा सरंक्षण दल, निम संरक्षण दल, पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी किंवा माजी सैनिकांचा सन्मान महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

तसेच महापालिका स्तरावरील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शासकीय कार्यालये आणि शहरवासीयांनी प्रतिज्ञा घेण्याबाबत शासनामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तर महापालिकेच्या वतीने शहरातील योग्य अशा एका ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व ध्वजारोहन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.