Pune : सूर-तालाच्या मिलाफात रंगली कोजागिरी संध्या

एमपीसी न्युज – टिपूर चांदण्याच्या प्रकाशाने आसमंत उजळला असताना अभिजात स्वरांचा व श्रवणीय तालाचा सुरेख मिलाफ स्वर मंचावर झाला. सप्तसूर चंद्राच्या शुभ्रतेत जणू एकरूप व्हावे, अशा सुरेल वातावरणात रंगलेली कोजागिरीची संध्या काल रसिक पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते ‘श्रद्धा सुमन’ मैफलीचे.

तालायन म्युझिक सर्कलचे तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद आणि संस्थापिका सौ. अनुपमा आजाद यांनी तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ या मैफलीचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिद्ध तबलावादक पं. नयन घोष, उस्ताद फैयाज हुसेन खान, पं. सुहास व्यास, मुख्य आयुक्त, पुणे आयकर विभाग श्री. आशू जैन तसेच

आयकर विभागाचे आयुक्त श्री.आदर्श मोदी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पं. नयन घोष यांचे सुपूत्र, युवा कलाकार ईशान घोष यांच्या प्रस्तुतीने मैफीलीस प्रारंभ झाला. पारंपारिक क्रमाने तीनतालातील परण, पेशकार, कायदे,रेले आणि बंदिशीच सादरीकरण करत त्यांनी विविध तालांचे पैलू  उलगडले. दाया आणि बाया यांचा सुंदर समतोल, स्पष्ट आणि दमदार निकास,नृत्यास पोषक असलेल्या काही बंदिशी, फर्माईशीच लयदार सादरीकरण आणि उत्कृष्ट पढंत याद्वारे ईशान घोष यांनी मैफलीत अनोखे रंग भरले. मिलींद कुलकर्णी (संवादिनी) यांनी समर्पक साथ दिली.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा ‘भारतीय संगीताचा आश्वासक आवाज’ या शब्दांत आशीर्वाद लाभलेले पद्मश्री उस्ताद राशिद खान यांच गायन म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच ठरली. त्यांनी राग ‘पुरीया’ विलंब ख्याल लयीतून सादर केला. दादरामधील त्यांनी पेश केलेल्या ‘बात बात मै बित गयी रात’ या ठुमरीने रसिकांची मने जिंकली. प्रत्येक शब्दाचे भाव आपल्या गायकीतून उलगडून मांडण्याचा राशिद खान यांच्या सुरेल अंदाजामुळे मैफीलीची रंगत वाढली. पं. अरविंदकुमार आजाद(तबला) यांच्यासह मुराद अली (सारंगी), मिलींद कुलकर्णी (संवादिनी), नागेश आडगावकर, निखील जोशी, ओम गोंगाणी (तानपुरा), यांनी त्यांना पूरक साथ दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.