Maharashriya Kalopasak : महाराष्ट्रीय कलोपासक’तर्फे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राजा नातू करंडक नाटिका स्पर्धा

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेने प्राथमिक शाळेतील मुलांच्या भावभावनांचा पडदा येत्या जानेवारीत पुन्हा उघडणार आहे. प्राथमिक गटातील नाटिका स्पर्धा ते पुरुषोत्तम करंडक (Maharashriya Kalopasak) या दोन स्पर्धांमधील दुवा साधला जावा या उद्देशाने महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने यंदाच्या वर्षीपासून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी नाटिका स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कै. राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा नातू करंडक अशा नावाने ही स्पर्धा संबोधली जाणार आहे.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित स्पर्धांविषयीची माहिती संस्थेचे ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अनंत निघोजकर, मंगेश शिंदे हे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे सलग 25 वर्षे भालबा केळकर करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धा घेण्यात आली आहे तर महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.

NUHM : मानधनावरील ‘एनयुएचएम’च्या 144 कर्मचा-यांना महापालिका सेवेत कायम करा; नगरविकास विभागाचे आदेश

महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था नाट्यसंस्कार कला अकादमीच्या सहकार्याने गेल्या 5 वर्षांपासून प्राथमिक शाळास्तरावर (5 ते 10 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी) भालबा केळकर करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धांचे आयोजन करीत आहे. मुला-मुलींमधील नाट्यविषयक जाणिवांचे संस्कार व्हावेत, सभाधीटपणा,(Maharashriya Kalopasak) आत्मविश्वास या सारख्या गुणांना उत्तेजन मिळावे हा स्पर्धेचा उद्देश आहे. कोरोनामुळे दोन वर्षे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. नवीन वर्षात स्पर्धांना पुन्हा सुरुवात होणार आहे.

प्राथमिक आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील माध्यमिक गट ठरणार दुवा

प्राथमिक गटासाठी सलग 30 वर्षांपासून स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी होतात. दहा वर्षांवरील माध्यमिक स्तरावरील मुलांसाठी कोणत्याही एकांकिका स्पर्धांचे आयोजन होत नाही. प्राथमिक गटापासून सुरू झालेला हा नाट्यप्रवास महाविद्यालय स्तरावरील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेपर्यंत सलग चालत राहावा या हेतूने माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा आयोजित करण्याचा महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने निर्णय घेतला असल्याचे ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी सांगितले.(Maharashriya Kalopasak) पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी एकांकिकांचे लेखन करतात. अभिनय, तांत्रिक बाबींबरोबरच लेखनाचा हा प्रवास माध्यमिक स्तरापासून सुरू होऊ शकतो. शिक्षक-पालकही वेगवेगळ्या गटातील मुलांसाठी लेखन करू शकतात.

जानेवारी 2023 मधील दुसऱ्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्राथमिक गटातील मुलांच्या स्पर्धा होतील. त्यानंतर लगेचच्या आठवड्यात प्राथमिक फेरीतील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. तर तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवारी माध्यमिक गटातील मुलांच्या स्पर्धा होतील आणि दि. 27 जानेवारी रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल.

 

शिक्षकांसाठी कार्यशाळा

स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही गटातील शिक्षकांसाठी दोन दिवसीय नाट्य कार्यशाळा घेतली जाणार असून अभिनय, लेखन, दिग्दर्शन याविषयी तज्ज्ञ कलावंताद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना यात सहभागी होता येणार आहे. नाट्य कार्यशाळा इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी, अप्पा बळवंत चौक येथे होणार असून कार्यशाळा विनामूल्य आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी दि. 15 सप्टेंबर रोजी दोन्ही गटातील शिक्षकांची बैठक घेतली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.