Pimpri: यापुढे पालिकेचे सर्व कामकाज मराठीतून; भाषेचा वापर करण्यास टाळाटाळ केल्यास शिस्तभंगाची कारवाई

विभागप्रमुख असणार ‘मराठी भाषा दक्षता अधिकारी’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कामकाज आता राजभाषा मराठीतूनच होणार आहे. प्रत्येक विभागामार्फत संपुर्ण कामकाज मराठीतच करण्यात यावे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना काढला आहे. तसेच प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख हे ‘मराठी भाषा दक्षता अधिकारी’ असणार असून मराठीचा वापर करण्यासंदर्भात जे अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पालिकेतून होणारा सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतून करणे अनिवर्या आहे. पालिका अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने दैनंदिन शासकीय कामकाज मराठी भाषेचा वापर करणे सोपे जावे, मराठी भाषा व्यवहाराची भाषा म्हणून वापरण्याकरिता सरकारच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यालयांकडून प्रकाशित केलेल्या विविध शब्दकोश, परिभाषा कोश यासारख्या साधन सामुग्रीची सविस्तर माहिती. त्याच्या उपलब्धतेबाबतचा तपशील शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आला आहे. राज्य सरकारने मराठी भाषेचा वापर करण्याबाबतचे परिपत्रक महिन्याभरापूर्वीच जारी केले आहे. त्याची अमंलबजावणी महापालिकेने सुरु केली आहे.

महापालिकेच्या योजनांची माहिती देताना, चर्चा करताना, दूरध्वनीवर बोलताना, सभेत भाषेण करताना, बैठकीत बोलताना, विविध विषयांचे सादरीकरण, नागरिकांना होणारा सर्व पत्रव्यवहार, पत्ररे, परवाने, कार्यालयांतर्गत वापरल्या जाणा-या नोंदवह्या, प्रमाण नमुने, प्रपत्रे, नियमपुस्तिका, टिप्पण्या, नस्त्या, पत्रव्यवहारावरील शेरे, अभिप्राय, धोरणे, आदेश, अधिसूचना, प्रारुप नियम, आदेश, परिपत्रके, अहवाल, बैठकांची कार्यवृत्ते, संकेतस्थळे मराठीत भाषेत असावेत.

कार्यालयातील नामफलकावर अथवा पत्रव्यवहारावर अधिका-यांचे नाव मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे मराठीत भाषांतर न करता ती मराठीतूच लिहावीत. पदनामाचा उल्लेखही मराठी भाषेतच असावा. कार्यालयातील पाट्या, फलक मराठीतून असावेत. पालिका कामकाज, पत्रव्यवहारामध्ये, निमंत्रणपत्रिकेमध्ये आणि इतर बाबींसंदर्भात रेल्वे स्थानके, गावांची नावे यांच्या नावाचा उल्लेख करताना मराठी भाषेत देवनागिरी लिपित नावे लिहावीत. समारंभांची निमंत्रणे मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. क्वचित प्रसंगी आवश्यक असल्यास मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून निमंत्रण पत्रिका असावी. महापालिकेच्या जाहिराती व निविदा मराठी भाषेतच प्रसिद्ध करण्यात याव्यात. पदभरतीसाठी घेतल्या जाणा-या परिक्षा मराठीतूनच घेण्यात याव्यात. एखाद्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून लिहिण्याचा परवानगी मागितल्यास विभागप्रमुखांना देता येईल.

समित्यांचे कामकाज, त्याचे अहवाल मराठी भाषेतच असावेत. संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणारी माहिती मराठी भाषेतून असावी. महापालिकेतर्फे न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे मराठी भाषेतून दाखल करण्यात यावेत. दंड वसूलीच्या पावत्या, विविध परवाने, उद्याने, पर्यटनस्थळे इत्यादी ठिकाणी आकारण्यात येणा-या प्रवेश शुल्काच्या पावत्या मराठी भाषेतून देण्याची दक्षता घ्यावी. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने माहिती अधिकार, ई-निविदा, ऑनलाईन सेवा/पोर्टल मराठी भाषेत उपलब्ध असावे. ई-ऑफीस अंतर्गत रजा, हजेरीपत्रक (बायोमॅट्रीक)संदर्भात उपलब्ध केलेल्या सुविधा मराठीतून उपलब्ध असाव्यात, असे याबाबतच्या परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.