Pimpri: पालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा वाद; 7 जानेवारी 2019 ला पुढील सुनावणी

वैद्यकीय अधिकारीपदाबाबतचा निर्णय ‘जैसे थे’; आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय कायम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय की डॉ. पवन वसंत साळवे यांची नियुक्ती करावी, हा विषय न्यायालयात सुरु आहे. याबाबतची सुनावणी 3 जुलैला होती. परंतु, न्यायालयाने वेळेअभावी सुनावणी लांबणीवर टाकली असून पुढील वर्षी म्हणजेच 7 जानेवारी 2019 ला पुढील सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत वैद्यकीय अधिकारीपदाबाबत ‘जैसे थे’ निर्णय ठेवा, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय कायम असणार आहेत.

तत्कालीन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांच्या निवृत्तीनंतर गेली पाच वर्ष हे पद रिक्त आहे. या जागेवर राष्ट्रवादीच्या काळात रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, या नियुक्तीला अतिरिक्त वैद्यकीय संचालक साळवे यांनी आव्हान दिले. आपली सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता असताना डावलेल्या गेल्याची भूमिका साळवे यांनी मांडली आहे. याबाबत अनुसुचित जाती-आयोग, राज्य सरकारचे दरवाजे साळवे यांनी ठोकले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आरोग्य वैद्यकिय अधिकारी पदाबाबत यथोचित निर्णय घेण्याच्या आदेश दिले होते. विभागीय पदोन्नती सभेत आयुक्त हर्डीकर यांनी सावध पवित्रा घेत आरोग्य वैद्यकिय अधिकारी पद आणि वैद्यकीय संचालक पद समकक्ष असून त्याबाबतचा निर्णय विधी समितीने आणि महासभेने घ्यावा, अशी शिफारस केली होती.

त्यानंतर भाजपच्या राजवटीत आरोग्य वैद्यकिय अधिकारीपदी डॉ. पवन वसंत साळवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस 8 सप्टेंबर 2017 रोजी विधी समितीने महासभेकडे केली होती. दरम्यान, विधी समितीच्या या निर्णयाला आक्षेप घेत डॉ. के. अनिल रॉय यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने वैद्यकीय अधिकारीपदाबाबत ‘जैसे थे’ निर्णय ठेवा, असा निर्णय दिला होता. तरीदेखील सत्ताधारी भाजपने 20 मार्च रोजी झालेल्या महासभेत आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाचा न्यायप्रविष्ठ निर्णय मंजूर करुन आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय यांच्याऐवजी डॉ. पवन वसंत साळवे यांची नियुक्ती केली होती. परंतु, पदभाराबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असा निर्णय न्यायालयाने दिला असून याबाबतचा वाद न्यायालयात सुरु आहे.

याबाबतची सुनावणी 3 जुलैला होती. परंतु, न्यायालयाने वेळेअभावी सुनावणी लांबणीवर टाकली असून पुढील वर्षी म्हणजेच 7 जानेवारी 2019 ला पुढील सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत वैद्यकीय अधिकारीपदाबाबत ‘जैसे थे’ निर्णय ठेवा, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय कायम असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.