Pimpri: समित्या सभापती निवडीनंतर आता महापौर, सभागृह नेते बदलाच्या मागणीला जोर

पावसाळी अधिवेशना दरम्यान ठरणार तिघांचे भवितव्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समिती सभापती, प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता बदलण्याच्या मागणीने उचल खालली आहे. नागपूरातील पावसाळी अधिवेशना दरम्यान पदाधिकारी बदलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची बैठक होणार असल्याचे, भाजपमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पावसाळी अधिवेशना दरम्यानच महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे आणि सभागृह नेते एकनाथ पवार या तिघांचे भवितव्य ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभा-यांनी सर्व नगरसेवकांना पंचवार्षिकमध्ये एक तरी पद देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार स्थायी समितीतील सदस्यांना एक वर्षांचाच कार्यकाळ देण्यात आला. त्यानंतर विषय समितींचे सभापती, प्रभाग समिती अध्यक्ष बदलण्यात आले. त्याचबरोबर प्रभाग समित्यांवर दोन्ही आमदारांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावली आहे. ममता गायकवाड यांच्या रुपाने सर्वांत महत्वाचे स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड मतदार संघाकडे आहे. तसेच विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौघुले आणि जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या सभापती उषा मुंढे या चिंचवड मतदार संघातील आहेत. तर, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे भोसरी मतदार संघातील आहेत. तर, शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज भरलेल्या प्रा. सोनाली गव्हाणे या भोसरी मतदार संघातीलच आहेत. असे पदांचे वाटप झाले असून समिती सभापती बदलण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यामुळे आता महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे आणि सभागृह नेते एकनाथ पवार यांना बदलण्याची मागणी पक्षातून वाढली आहे.

भाजपच्या पद वाटपाच्या धोरणानुसार महापौरपद भोसरी मतदार संघाकडे, स्थायी समिती अध्यक्षापद चिंचवडकडे तर सभागृह नेतेपद नितीन गडकरी गटाकडे आहे. आता यामध्ये बदल करण्यात येणार आहे. महापौरपद चिंचवडकरांना हवे आहे. तर, सभागृह नेते पद भोसरीकरांना अत्यंत निकटच्या व्यक्तीला द्यायचे आहे.

महापौरपदासाठी स्थायी समिती सभापतीपदासाठी डावलण्यात आलेले आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम आणि नामदेव ढाके यांची नावे चर्चेत आहेत. तसेच विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले वसंत बोराटे हे देखील दावेदार आहेत. लोंढे यांनी तर पत्रकार परिषद घेऊन आपण महापौरपदाचा दावेदार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, शत्रुघ्न काटे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला असून जात प्रमाणपत्राची फेर पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांचे नाव महापौरपदाच्या शर्यतीतून मागे पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी शशिकांत कदम, राहुल जाधव आणि संतोष लोंढे यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. महापौरपद चिंचवडकडे गेल्यास सभागृह नेतेपद चिंचवमधीलच निष्ठावान नगरसेवक नामदेव ढाके किंवा भोसरीकरांच्या अतिशय निकटच्या व्यक्तीकडे जाण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.