Senior Citizen day: पूर्णविराम माहिती नाही, त्यामुळे आनंदाने जगा – प्रा. गणेश शिंदे

एमपीसी न्यूज: “कोणीतरी येणार असल्याचे आपल्याला नऊ महिने अगोदर समजते. पण, कोण जाणार आहे हे आपल्याला नऊ मिनिटेही अगोदर समजत नाही.(Senior Citizen day) आपला पूर्णविराम कुठे आहे, याची माहिती नाही. त्यामुळे आनंदाने जगावे. ज्येष्ठांना सांभाळावे. आनंदाची संकल्पना समजून घेण्यासाठी घरात ज्येष्ठ नागरिक पाहिजेत. त्यांना जपले पाहिजे. प्रत्येकाने एकमेकांचे कौतुक करावे. आनंदाने बोलावे आणि घरात संवाद ठेवावा. छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंद घेवून जगावे”, असे मोलाचे मार्गदर्शन प्रसिद्ध वक्ते प्रा. गणेश शिंदे यांनी केले.

श्री समर्थ युवक प्रतिष्ठान व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर प्रा. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. निगडी, प्राधिकरणातील मनोहर वाढोकर सभागृहात शनिवारी (दि. 27 ) रोजी झालेल्या कार्यक्रमाला आयोजक माजी नगरसेवक, पवना सहकारी बँकेचे संचालक अमित राजेंद्र गावडे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा चांदबी सय्यद, ह. भ. प. किसन महाराज चौधरी, शब्दरंग साहित्य कट्टयाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शब्दरंगच्या ज्योती कानेटकर आणि त्यांच्या टीमने स्वच्छतेबाबतचे पथनाट्य सादर करत स्वच्छतेचा संदेश दिला.

ज्येष्ठांची व्याख्या वयावर ठरवली जाते हे फार चुकीचे असल्याचे सांगत प्रा. गणेश शिंदे म्हणाले, “फार पैसा, साधने नसताना जुनी पिढी समृद्धपणे जगली. 100/200 रुपयात नोकरीला सुरुवात केली. आनंद पैशात नव्हता. पूर्वी त्याग होता. पैसे नव्हते पण भरभरून आनंद, मजा होती. आता पैसा आहे. पण, आनंद नाही. आता आम्ही आनंदी आहोत हे ‘स्टेट्स’ ठेवून लोकांना दाखविले जाते.(Senior Citizen day) आनंदाची संकल्पना समजून घेण्यासाठी घरात ज्येष्ठ नागरिक पाहिजेत. त्यांना जपले पाहिजे. ज्येष्ठांकडून छत्रपती शिवाजी महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज समजून घेता येतात. माणसे हल्ली बोलत नाहीत. साधनामध्ये माणसे व्यस्त झाली आहेत.

Pune News: कोकण कन्यांचा सुरांनी जिंकली पुणेकरांची मने 

माणसांनी व्यक्त झाले पाहिजे, बोलले पाहिजे. जीवंत आहे, तोपर्यंत बोलत जावे. माणूस गेल्यानंतर केवळ आठवणी राहतात. ही नाती परत सापडत नाहीत. तरुणांवर ओतप्रोत प्रेम करणारे आई वडील आहेत, त्या आई-वडिलांचे कष्ट विसरू नये, त्याची जाणीव ठेवावी. नशिबाने ज्यांच्या घरात म्हातारी माणसे आहेत. त्यांना जपा, संवाद साधा तुमच्या प्रगतीवर मनापासून खुश होणारे आई -वडीलच आहेत.(Senior Citizen day) तरुणही म्हातारे होणार आहेत. म्हातारी माणसे लहान मुलांसारखी हट्टी असतात. त्यामुळे त्यांची सेवा करावी. त्यांच्याशी भरभरून बोलावे. डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे ज्येष्ठांनी घ्यावीत पण मनाने म्हातारे होऊ नका, धावपळीत जे जगता आले नाही, ते आता जगून घ्यावे. या वयात बायकोचे कौतुक करावे. प्रत्येकाने कौतुक करावे, त्याला काहीच लागत नाही. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधावा”.

प्रा. शिंदे पुढे म्हणाले, “आता तास-तासभर मुले मोबाईलवर आहेत. मुलांचे डोळे चालले. तरी, बापाला मुलाचे कौतुक वाटते. पूर्वी मूल रडायला लागले की आई मुलाला जवळ घ्यायची. मूल रडायला थांबायचे. आता मूल रडायला लागले की मोबाईल दिला जातो. नात्यातील मजा जाऊ देऊ नका, प्रेमाचा स्पर्श होऊ द्यावा. मुलांचा स्पर्श कमी करू नका, पोरांशी मोकळे वातावरण, संवाद ठेवावा. नात्यातील जिव्हाळा, ओढ ठेवावी.(Senior Citizen day) नाती टिकवण्यासाठी कोणी तरी त्याग करावा लागतो. पराक्रम रणांगणात गाजवायचा असतो. नात्यामध्ये नाही. नात्यात प्रेम जपावे. येणाऱ्या पिढीसाठी आदर्श निर्माण करून ठेवा. द्वेष, मत्सर, इर्षा, स्पर्धा बाजूला ठेवून नाती जपावीत. आयुष्य खूप क्षणभंगुर आहे. त्यामुळे आहे, त्या गोष्टीत आनंदी जगावे. साध्या गोष्टीतून जगता, आनंद घेता येतो. फक्त द्वेष बाजूला ठेवावा. प्रत्येकात वेगळे स्कील आहे. त्यामुळे आपल्या स्कीलमध्ये काम करून आनंदी जगावे. आयुष्याचा उत्सव करावा”.

आयोजक अमित राजेंद्र गावडे म्हणाले, “दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त व्याख्यान, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.(Senior Citizen day) गेल्यावर्षी ज्येष्ठांकडून सकारात्मक अनुभव मागविले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या अनुभवांचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे नाव ‘जीवन आनंद’ ठेवले. प्रत्येक कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो”.

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा चांदबी सय्यद प्रास्ताविकात म्हणाल्या, “प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आरोग्य शिबिर, शिक्षकांचा सत्कार केला जातो. गरजू रुग्णांना कमी दरात साहित्य पुरवतो.(Senior Citizen day) दर शुक्रवारी विविध कार्यक्रम राबवितो. व्याख्यान, करमणुकीचे कार्यक्रम घेतो. या वयातही ज्येष्ठ सभासद उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात सहभागी होतात. या विविध उपक्रमाला अमित राजेंद्र गावडे यांचे मार्गदर्शन, पाठबळ, सहकार्य मिळते”.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका आचार्य यांनी अगदी नेटके केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय, तसेच आभार प्रदर्शन चंद्रशेखर जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपलब्ध वाढोकर सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.